Newasa : भालगावच्या शिक्षक दाम्पत्याची ‘आयडॉल शिक्षक’ उपक्रमासाठी निवड
Newasa : नेवासा तालुक्यातील भालगाव जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक राहुल आठरे आणि शितल झरेकर-आठरे यांची ‘आयडॉल शिक्षक २०२६-२७’ उपक्रमासाठी निवड झाली आहे.

Newasa : शैक्षणिक क्षेत्रात नाविन्यपूर्ण आणि गुणवत्तापूर्ण काम करणाऱ्या शिक्षकांची दखल घेण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या वतीने ‘आयडॉल शिक्षक २०२६-२७’ हा राज्यस्तरीय उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमासाठी नेवासा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, भालगाव येथील शिक्षक राहुल आठरे आणि शिक्षिका शितल झरेकर-आठरे या शिक्षक दाम्पत्याची निवड झाली आहे.
गेल्या तीन वर्षांपासून आठरे दाम्पत्याने शाळेत विविध नाविन्यपूर्ण उपक्रम राबविले. विद्यार्थीकेंद्रित शिक्षण, तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी काम केले. तसेच ‘मिशन आपुलकी’च्या माध्यमातून शाळेच्या भौतिक सुविधांमध्येही सुधारणा करण्यात आली. त्यांच्या या कार्याची दखल घेत ‘आयडॉल शिक्षक’ उपक्रमासाठी निवड करण्यात आली.
या निवडीबद्दल गटविकास अधिकारी संजय लखवाल, गटशिक्षणाधिकारी शिवाजी कराड, विस्तार अधिकारी योगेश राणे, केंद्रप्रमुख बाळासाहेब काशीद यांच्यासह सरपंच, उपसरपंच, शाळा व्यवस्थापन समिती, पालक आणि ग्रामस्थांनी शिक्षक दाम्पत्याचे अभिनंदन केले.





