S. Jaishankar – जागतिक प्रशासकीय संस्थांमध्ये तातडीने सुधारणा करण्याची मागणी परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी शुक्रवारी केली. विद्यमान बहुपक्षीय चौकट ही परस्परांशी जोडलेल्या, गुंतागुंतीच्या आणि बहुध्रुवीय जगाच्या वास्तवाशी जुळवून घेण्यात अपयशी ठरली आहे, असे ते म्हणाले. जागतिक प्रशासन आणि बहुपक्षीय प्रणालीतील सुधारणा या विषयावरील ब्रिक्स सत्राला ते संबोधित करत होते. घटणारा विश्वास आणि निर्णयप्रक्रियेतील अकार्यक्षमतेमुळे बहुपक्षीय संस्थांची विश्वासार्हता आणि परिणामकारकता वाढत्या प्रमाणात तपासली जाते आहे. जागतिक प्रशासनाला आधार देणाऱ्या संरचना या बदलांशी जुळवून घेऊ शकलेल्या नाहीत, असे ते म्हणाले. सुधारणा ही निवडीची बाब नसून, गरज आहे, असे ते पुढे म्हणाले. सुधारित बहुपक्षीयवादावरील भारताच्या दीर्घकालीन भूमिकेवर जोर देत जयशंकर म्हणाले की, जागतिक संस्थांनी समकालीन वास्तवाचे प्रतिबिंब दाखवले पाहिजे आणि उदयोन्मुख बाजारपेठा व विकसनशील देशांच्या आकांक्षांना प्रतिसाद दिला पाहिजे. या प्रयत्नासाठी संयुक्त राष्ट्रांची सुधारणा केंद्रस्थानी आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सदस्यत्वात आणि जबाबदाऱ्यांमध्ये लक्षणीय वाढ होऊनही, संस्थेची प्रमुख संरचना, विशेषतः सुरक्षा परिषद, अजूनही एका जुन्या काळाचे प्रतिबिंब दाखवत आहे. आशिया, आफ्रिका आणि लॅटिन अमेरिकेला अधिक प्रतिनिधित्व देण्याची गरज आहे. स्थायी आणि अस्थायी दोन्ही श्रेणींमध्ये विस्तारासह अर्थपूर्ण सुधारणांशिवाय, संयुक्त राष्ट्रांची परिणामकारकता आणि विश्वासार्हता मर्यादित राहील, असेही ते म्हणाले. व्यापारी संघटना सर्वसमावेशक असावी… पुरवठा साखळ्यांमधील असुरक्षितता, अन्न आणि ऊर्जा सुरक्षेवरील दबाव आणि महत्त्वपूर्ण संसाधनांपर्यंत पोहोचण्यातील असमानता याकडे लक्ष वेधत जयशंकर यांनी आंतरराष्ट्रीय वित्तीय रचनेत बदल करण्याची मागणीही केली. मोठ्या प्रमाणावर संसाधने उभारण्यासाठी बहुपक्षीय विकास बँका “अधिक मजबूत, अधिक प्रतिसादक्षम आणि अधिक सुसज्ज” बनणे आवश्यक आहे, त्याचबरोबर विकास आणि हवामान वित्तपुरवठा अधिक सुलभ करून तो राष्ट्रीय प्राधान्यक्रमांशी सुसंगत केला पाहिजे. जागतिक व्यापार संघटना केंद्रस्थानी ठेवून बहुपक्षीय व्यापार प्रणाली नियमांवर आधारित, न्याय्य, खुली आणि सर्वसमावेशक राहिली पाहिजे. या प्रणालीने विषमता दूर केली पाहिजे आणि विकसनशील देशांच्या चिंतांचा विचार केला पाहिजे, अशी अपेक्षाही जयशंकर यांनी व्यक्त केली.