UPSC: सासरचा छळ, 7 वर्षांच्या मुलीचा भार; तरी जिंकली युपीएससीची लढाई, मिळवली 177 वी रँक

लखनौ: उत्तर प्रदेशातील पिलखुवा येथील रहिवासी असलेल्या शिवांगी गोयलने यूपीएससी परीक्षेत 177 वा क्रमांक मिळवून केवळ तिच्या जिल्ह्याचेच नव्हे तर तिच्या पालकांची मान उंचावली.
शिवांगीच्या घरी अर्थात तिच्या माहेरी तिचं आणि तिच्या पालकांचं अभिनंदन करण्यासाठी लोकांची गर्दी जमली आहे. शिवांगीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील आणि तिची ७ वर्षांची मुलगी रैना अग्रवाल हिला दिले.
शिवांगीने सांगितले की, जेव्हा मी शिक्षण घेत होते, तेव्हा महाविद्यालयाच्या मुख्याध्यपकांनी मला आयएएस अधिकारी होण्यासाठी प्रोत्साहन दिलं होतं. त्यानंतर मी दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेज ऑफ कॉमर्स कॉलेजमध्ये प्रवेश घेऊन आयएएस परीक्षा दिली. मात्र मला अपयश आल्याचं शिवांगी म्हणाली.
दरम्यान माझे लग्न झाले. मात्र मला माझ्या सासरच्या मंडळीकडून खूप त्रास देण्यात आला. आपल्यासोबत घरगुती हिंसाचार झाला. त्यामुळे माझ्या वडिलांनी आणि आईने मला माहेरी आणल्याचं शिवांगीने सांगितलं.
शिवांगीने पुढं सांगितलं की, मला एक लहान मुलगीही आहे. 2019 मध्ये माझे वडील मला म्हणाले की, आता तुला जे करायचे ते कर. त्यामुळे मला पुन्हा एकदा आयएएस अधिकारी बनण्याची प्रेरणा मिळाली. मी रात्रंदिवस मेहनत करून 2019 मध्ये परीक्षा दिली, ज्यामध्ये मी यशस्वी होऊ शकले नाही. आता तिसर्या प्रयत्नात माझी निवड झाली आहे.
शिवांगीने म्हटलं की, माझा ऑल इंडियात 177 वा क्रमांक आहे. माझ्या यशाचे श्रेय मला माझ्या आई-वडिलांना आणि विशेषत: माझ्या मुलीला द्यायचे आहे. ज्यांनी मला आयएएस होण्यासाठी पूर्ण सहकार्य केलं.
दरम्यान ज्या महिलांना सासरच्यांकडून त्रास सहन करावा लागतो, अशा महिलांना मला प्रेरणा द्यायची आहे. तुम्हाला लिहिता-वाचता येत असेल तर तुम्ही स्वत:च्या पायावर उभं राहू शकता, आएएस बोऊ शकता, असंही शिवांगीने म्हटलं.





