Muzammil Ibrahim : दीपिकासोबतच्या नात्याच्या दाव्यावरून गदारोळ; अखेर मुजम्मिल इब्राहिमने तोडले मौन
Muzammil Ibrahim मुजम्मिल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ही मुलाखत खूप मोठी होती. मात्र, सोशल मीडियावर त्यातील काही सेकंदांचे किंवा काही मिनिटांचेच क्लिप्स शेअर करण्यात आले. त्या क्लिप्समध्ये त्यांनी कोणत्या संदर्भात आणि कोणत्या भावनेने बोलले होते, हे पूर्णपणे दिसत नाही.

Muzammil Ibrahim: बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पादुकोणसोबतच्या कथित रिलेशनशिपबाबत केलेल्या वक्तव्यामुळे अभिनेता आणि मॉडेल मुजम्मिल इब्राहिम गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहेत. एका मुलाखतीत त्यांनी दीपिकासोबत दोन वर्षे रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा केला होता. तसेच दीपिकानेच त्यांना प्रपोज केल्याचे आणि नंतर त्यांनीच हे नाते संपवले असल्याचेही त्यांनी सांगितले होते. या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर त्यांना मोठ्या प्रमाणावर ट्रोल करण्यात आले. अनेकांनी प्रसिद्धी मिळवण्यासाठी त्यांनी दीपिकाचे नाव वापरल्याचा आरोप केला.
या वादानंतर आता मुजम्मिल इब्राहिम यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत संपूर्ण प्रकरणावर स्पष्टीकरण दिले आहे. त्यांनी सांगितले की, सध्या चर्चेत असलेली मुलाखत ही प्रत्यक्षात वर्षभरापूर्वी रेकॉर्ड करण्यात आली होती. आता ती पुन्हा व्हायरल होत असून त्यातील काही निवडक भागच सोशल मीडियावर दाखवले जात आहेत. त्यामुळे त्यांच्या बोलण्याचा मूळ संदर्भ हरवला आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुजम्मिल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले की, ही मुलाखत खूप मोठी होती. मात्र, सोशल मीडियावर त्यातील काही सेकंदांचे किंवा काही मिनिटांचेच क्लिप्स शेअर करण्यात आले. त्या क्लिप्समध्ये त्यांनी कोणत्या संदर्भात आणि कोणत्या भावनेने बोलले होते, हे पूर्णपणे दिसत नाही. एडिटिंगमुळे अनेकदा एखाद्या वक्तव्याचा खरा अर्थ बदलतो आणि त्यामुळे गैरसमज निर्माण होतात, असे त्यांनी म्हटले.

Muzammil Ibrahim
त्यांनी पुढे सांगितले की, आपल्या आयुष्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीबद्दल आपण नेहमी आदरानेच बोलण्याचा प्रयत्न केला आहे. भूतकाळातील नातेसंबंधांबाबतही त्यांनी कधीही कोणाचा अपमान करण्याचा हेतू ठेवला नाही. भविष्यातही ते याच भूमिकेवर कायम राहतील, असे त्यांनी स्पष्ट केले.
मुजम्मिल यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले की, अनेक वर्षांच्या मेहनतीनंतर त्यांनी आपले करिअर आणि आयुष्य घडवले आहे. त्यामुळे केवळ काही व्हायरल क्लिप्सच्या आधारे त्यांच्याबद्दल चुकीचे मत तयार करू नये, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली. कोणतीही गोष्ट प्रामाणिकपणे आणि आदराने मांडणे हा त्यांचा स्वभाव असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, मुजम्मिल यांच्या जुन्या मुलाखतीतील वक्तव्य पुन्हा चर्चेत आल्यानंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटल्या. काहींनी त्यांच्या दाव्यावर विश्वास व्यक्त केला, तर अनेकांनी हा प्रसिद्धी मिळवण्याचा प्रयत्न असल्याचे म्हणत त्यांच्यावर टीका केली. विशेष म्हणजे, या संपूर्ण वादावर दीपिका पादुकोण किंवा त्यांच्या टीमकडून अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.
सध्या मात्र मुजम्मिल इब्राहिम यांच्या स्पष्टीकरणाची सोशल मीडियावर चर्चा सुरू असून, त्यांच्या या पोस्टनंतर वाद शांत होणार की आणखी रंगणार, याकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.





