एसटी महामंडळाची वर्दी घालून इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड करणं महागात; महिला कंडक्टर निलंबित

उस्मानाबाद – उस्मानाबाद जिल्ह्यातील एका महिला कंडक्टरला इन्स्टाग्रामवर व्हिडीओ अपलोड करणे चांगलेच महागात पडले आहे. एसटी महामंडळाने संबंधित महिला कंडक्टरवर थेट निलंबनाची कारवाई केली आहे. मंगल सागर गिरी असे निलंबित करण्यात आलेल्या महिला कंडक्टरचे नाव आहे.
गिरी या उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब एसटी आगारात कार्यरत आहेत. एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्यामुळे मंगल गिरी यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. महामंडळाने वाहतूक कंट्रोलरला देखील याच कारणाने निलंबित केले आहे. कल्याण कुंभार असे वाहतूक कंट्रोलरचे नाव आहे.
निलंबित महिला कंडक्टरचे सोशल मीडियावर लाखो फॉलोअर्स आहेत. गिरी या वेगवेगळ्या गाण्यावर व्हिडीओ बनवून सोशल मीडियावर व्हायरल करतात. त्यांचे वेगवेगळे असे व्हिडीओ सोशल मीडियावर धुमाकूळ घातलात. परंतु, गिरी यांनी एसटी महामंडळाचा ड्रेस घालून तुळजाभवानी देवीच्या गाण्यावर व्हिडीओ करून तो इन्स्टाग्रामवर अपलोड केला.
त्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड वायरल झाला. यानंतर स्वतःचे व्हिडीओ बनवून एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन केल्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला. यामुळे एसटी महामंडळाची प्रतिमा मलीन झाल्याचे सांगत महांडळाकडून त्यांना निलंबित करण्यात आले आहे.





