Delhi CM Ceremony update | दिल्ली विधानसभा निवडणुकीत तब्बल २७ वर्षानंतर भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजपाला ४८ जागा, आम आदमी पक्षाला २२ जागा दिल्लीच्या विधानसभेत मिळवण्यात यश आले. तर काँग्रेस पक्षाला एकही जागा जिंकता आलेली नाही. दिल्लीत भाजप विजयी झाल्यानंतर दिल्लीतील मुख्यमंत्रीच्या चेहऱ्यासाठी अनेक नावे चर्चेत आली. यातच आज सोमवारी १७ फेब्रुवारी भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ पक्षाची बैठक दुपारी ३ वाजता होणार आहे. त्यामध्ये नव्या मुख्यमंत्र्यांची निवड होईल, असे वृत्त एका वाहिनीने रविवारी भाजप सुत्रांच्या हवाल्याने दिले. लवकरच सस्पेन्स संपणार राजधानी दिल्लीतील सत्ताबदलानंतर मुख्यमंत्री कोण बनणार? याविषयी मोठी उत्सुकता आहे. तो सस्पेन्स आज संपुष्टात येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे या बैठकीकडे अनेकांचं लक्ष लागलेलं आहे. तसेच या बैठकीत मुख्यमंत्री ठरल्यास नवीन सरकारचा शपथविधी सोहळा १८ किंवा १९ फेब्रुवारीला होणार असल्याची माहिती देखील सांगितली जात आहे. राजधानीतील रामलीला मैदानावर मुख्यमंत्र्यांचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. Delhi CM Ceremony update | भाजपाचे सर्व ४८ नवनिर्वाचित आमदार सोमवारी दिल्ली भाजपाच्या कार्यालयात दाखल होतील. त्यानंतर होणाऱ्या बैठकीत मुख्यमंत्री पदासाठी नावावर शिक्कामोर्तब होईल आणि सरकार स्थापनेचा शपथविधीची तारीखही ठरण्याची शक्यता आहे. दिल्लीच्या निकालाच्या दिवसापासून परवेश वर्मा, आशीष सूद आणि रेखा गुप्ता यांच्यासह अनेक नावांची चर्चा मुख्यमंत्री पदासाठी सुरू आहे. मात्र, याबाबत पक्ष नेतृत्व अद्याप मौन बाळगून आहेत. दुसरीकडे भाजपाच्या नेत्यांनी महिलेला मुख्यमंत्री म्हणून नियुक्त करण्याच्या किंवा पूर्णपणे नवीन चेहरा निवडण्यासंदर्भातले संकेत देखील दिले आहेत. Delhi CM Ceremony update | प्रमुख मंत्रिपदासाठी १५ आमदारांची निवड ? सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाजपाच्या नव्या सरकारमध्ये प्रमुख मंत्रिपदासाठी १५ आमदारांची निवड करण्यात आलेली आहे. तसेच नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्री होण्याची शक्यता कमी असल्याचेही सांगितले जात आहे. हेही वाचा: दिल्ली भूकंपाच्या धक्क्यांनी हादरली; लोकांमध्ये घबराट; पंतप्रधान मोदींनी केले आवाहन…