UP Election : पक्षाच्या प्रचारात जोरकसपणे उतरल्या जया बच्चन

जौनपुर – उत्तरप्रदेश निवडणुकीच्या प्रचारात समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन या शुक्रवारी प्रथमच येथे पक्षासाठी प्रचारात उतरलेल्या दिसल्या. जौनपुर येथे घेतलेल्या सभेत त्यांनी अखिलेश यादव यांच्या नेतृत्वावर कौतुकाचा वर्षाव करताना त्यांनी एक कविताच सादर केली. युपी की हर समस्या का एकही है हल- अखिलेश की अकल असे त्यांच्या कवितेचे शिर्षक होते.
अखिलेश यादव यांच्या पत्नी डिम्पल सुद्धा या सभांमध्ये त्यांच्या समवेत सहभागी झाल्या होत्या. सिराथू मतदार संघात त्यांनी समाजवादी पक्षाच्या उमेदवार पल्लवी पटेल यांच्यासाठी प्रचार सभा घेतली. आज त्यांनी मडियाहु आणि मछली शहर मतदार संघातही प्रचार सभा घेतल्या. लाल टोपी घालून त्यांनी आपल्या फिल्मी अंदाजात मतदारांवर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न केला.
जया बच्चन या समाजवादी पक्षाच्या राज्यसभेच्या खासदार असल्या तरी त्या उत्तरप्रदेशच्या राजकारणात फारशा हस्तक्षेप करताना दिसत नाहीत. पण यावेळी मात्र त्या पक्षाच्या प्रचारासाठी उत्तरप्रदेशात ठिकठिकाणी सभा घेताना दिसत आहेत. त्यांचे बच्चन घराणे उत्तरप्रदेशातीलच आहे. अमिताभ बच्चन हे अलाहाबादचे रहिवासी आहेत. ते येथून एकदा कॉंग्रेसच्या तिकीटावर लोकसभेवर निवडून गेले होते.





