लखनौ : समाजवादी पक्षाचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांच्या सुनबाई अपर्णा यादव यांनी आज भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. गेले काही दिवस त्या भाजपनेत्यांच्या संपर्कात होत्या. त्या मुलायमसिंह यादव यांच्या दुसऱ्या पत्नीच्या मुलाच्या पत्नी आहेत.
उत्तरप्रदेशचे उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य आणि प्रदेश भाजप अध्यक्ष स्वतंत्र देवसिंह यांच्या उपस्थितीत त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. गेले काही दिवस पक्षातून मोठ्या प्रमाणात गळती सुरू झाली आहे. मात्र अपर्णा यांच्या प्रवेशामुळे भाजपला थोडा दिलासा मिळाला आहे. मात्र अपर्णा यांचा प्रवेश भाजपसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
मुलायमसिंह यादव यांच्या घरातील एक महत्वाचा सदस्य आपल्या पक्षात आल्याने भाजपच्या गोटात समाधानाचे वातावरण असले तरी अपर्णा यांना आता पक्षाकडून विधानसभेची उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. अपर्णा यांनी 2017 ची निवडणुक लखनौ कॅन्टोन्मेंट मतदार संघातून समाजवादी पक्षाच्या तिकीटावर लढवली होती. पण त्यांना भाजपच्या उमेदवार रिटा बहुगुणा यांच्याकडून पराभूत व्हावे लागले होते. आता त्याच मतदार संघातून पुन्हा त्या निवडणूक लढविण्यासाठी उत्सुक आहेत.
दुसरीकडे लखनौ कॅन्टोन्मेंट मतदार संघासाठी भाजपच्या खासदार रिटी बहुगुना जोशी देखील उत्सुक आहेत. आपल्या मुलाला लखनौ कॅन्टोन्मेंट मतदार संघातून उमेदवारी मिळविण्यासाठी त्या प्रयत्नशील आहेत. तशी मागणीही त्यांनी पक्षाकडे केली आहे. मात्र भाजपमध्ये एका कुटुंबात एक तिकीट असा नियम करण्यात आला आहे.
या पार्श्वभूमीवर रिटी बहुगुणा जोशी यांनी भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा यांना पत्र लिहून मुलाला तिकीट देण्याची मागणी केली आहे. त्यांनी म्हटलं की, माझा मुलगा मयंक मागील अनेक दिवसांपासून सक्रिय आहे. तो मेहनत घेतोय. त्याला विधानसभेचं तिकीट मिळायला हवं. पक्षाने मयंकला तिकीट दिल्यास आपण नियमांचं पालन करण्यास तयार असून खासदारकीचा राजीनामा देण्यात तयार असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.
दुसरीकडे आता अपर्णा यादव यांना कुठून उमेदवारी द्यायची हा प्रश्न भाजपसमोर निर्माण होणार आहे. त्याचं कारण म्हणजे अपर्णा यादव यांनी सपाकडून लखनौ कॅन्टोन्मेंट मतदार संघाची उमेदवारी मिळाली नसल्यामुळे पक्ष सोडला आहे. त्यामुळे सहाजिकच त्यांकडून देखील लखनौ कॅन्टोन्मेंट मतदार संघातून उमेदवारी मिळविण्याची मागणी होणार आहे. आता या मतदार संघात विद्यमान आमदार सुरेशचंद्र तिवारी, मयंक जोशी की अपर्णा यादव यांच्यापैकी कोणाला तिकीट द्यायच हा पेच भाजपसमोर तयार होणार आहे.