#UPElection2022 : राजकीय चमत्कार घडवणार?

संपूर्ण देशाचे लक्ष विधानसभा निवडणुकांच्या निकालांकडे लागले आहे. त्यातही सर्वांधिक महत्व उत्तरप्रदेशच्या निकालाला आहे. उत्तरप्रदेशात सत्तारूढ भाजपपुढे समाजवादी पक्षाने (सप) जबरदस्त आव्हान उभे केल्याचे बोलले जात आहे. सपचा बोलबाला पाहता त्या पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी स्वत:चे नेतृत्व प्रस्थापित केल्याचे म्हणता येईल. अखिलेश हे सपचे संस्थापक मुलायमसिंह यादव यांचे पुत्र. वाढत्या वयामुळे मुलायम यावेळच्या निवडणुकीत फारसे सक्रिय दिसले नाहीत.
त्यामुळे प्रथमच सप खऱ्याअर्थी अखिलेश यांच्या नेतृत्वाखाली लढत आहे. उत्तरप्रदेशात पाच वर्षांपूर्वी सत्ताबदल होण्याआधी अखिलेश यांनी मुख्यमंत्रिपदाची धुरा सांभाळली. ते त्या राज्याचे सर्वांत तरूण मुख्यमंत्री बनले.
आता सत्तेवर असणाऱ्या भाजपला सत्तेवरून दूर करण्यासाठी त्यांनी कंबर कसली आहे. अर्थात, उत्तरप्रदेशात भाजपचे वर्चस्व पाहता ती बाब तेवढी सोपी नाही. त्यामुळे भाजपला पराभूत करून सपने सत्ता मिळवण्याची घडामोड राजकीय चमत्कारच ठरेल. तो चमत्कार अखिलेश घडवणार का ते लवकरच समोर येईल. उत्तरप्रदेशात सत्ताबदल झाल्यास राष्ट्रीय राजकारणातील समीकरणेही बदलतील. बदललेल्या समीकरणांत सप आणि अखिलेश यांचे महत्व राष्ट्रीय पातळीवरही वाढेल.





