PM मोदींच्या निवृत्तीची चर्चा, योगी आदित्यनाथ होणार पुढचे पंतप्रधान?, म्हणाले, ‘राजकारण हे काही…’

UP CM Yogi Adityanath | शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळे मागील दोन दिवसांपासून पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीची चर्चा सुरू झाली आहे. 75 वर्षांनंतर राजकारणातील पदांवरून निवृत्तीचा नियम स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच बनवला असल्याचे वक्तव्य राऊत यांनी केल्यानंतर या चर्चांना सुरूवात झाली. तसेच, मोदींनंतर पंतप्रधान कोण होणार? याचीही जोरदार चर्चा रंगली आहे. या चर्चेच्या पार्श्वभूमीवर आता उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी यावर भाष्य केले आहे.
तुम्हाला भविष्यातील पंतप्रधान म्हणून पाहिले जाते, याविषयी काय म्हणालं? असा प्रश्न योगी आदित्यनाथ यांना विचारण्यात आला होता. राजकारण हे माझे पूर्णवेळ काम नाही. मी एक योगी आहे, असे उत्तर त्यांनी या प्रश्नावर दिले.
योगी आदित्यनाथ पंतप्रधानपदाच्या प्रश्नावर बोलताना म्हणाले की, मी उत्तर प्रदेशचा मुख्यमंत्री आहे. उत्तर प्रदेशच्या जनतेसाठी भाजपने मला इथे नेमले आहे. राजकारण हे काही माझे पूर्णवेळ काम नाही. ठीक आहे आता इथे काम करतोय. परंतु, मी एक योगी आहे.
कधीपर्यंत राजकारणात काम करत राहणार या प्रश्नावर उत्तर देताना ते म्हणाले की, ‘आम्ही आहोत तोपर्यंत आहोत. काम करतोय, करत राहू. त्याचीही काही मर्यादा आहे.’ एकीकडे पंतप्रधान मोदींच्या निवृत्तीची चर्चा सुरू असतानाच आता योगी आदित्यनाथ यांनी हे वक्तव्य केल्याने राजकीय वर्तुळात याविषयी चर्चा सुरू झाली आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुढीपाडव्याच्या दिवशी नागपूर येथील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुख्यालयाला भेट दिली होती. यानंतर संजय राऊत यांनी मोदी हे निवृत्ती अर्ज सादर करण्यासाठी संघ मुख्यालयात गेले होते. तसेच, पुढचा पंतप्रधान महाराष्ट्राचाच असेल, असे म्हटले होते. संजय राऊतांच्या या टिप्पणीनंतर मोदींच्या निवृत्तीबाबत चर्चा रंगली.





