Laxman Hake : अघटीत वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था; शरद पवारांच्या मंडल यात्रेवरून लक्ष्मण हाकेंची घणाघाती टीका

Laxman Hake : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने राज्यात मंडल यात्रेला सुरुवात झाली आहे. ९ अॅागस्ट या दिवशी क्रांती दिनाचे औचित्य साधत या यात्रेला नागपूर येथून सुरुवात करण्यात आली आहे. आता शरद पवार यांनी काढलेल्या मंडल यात्रेवर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी जोरदार टीका केली आहे. अघटीत वार्ता आणि कोल्हे गेले तीर्था असं म्हणत हाकेंनी टीका केली आहे.
पवारांची ही यात्रा म्हणजे जखम मांडीला आणि मलम ‘दुसरीकडे कुठंतरी….’ अशी परिस्थिती आहे. ही म्हण वापरण्याचं कारण म्हणजे ओबीसींना देशोधडीला लावणारा माणूस आज यात्रा काढतोय, अशी टीका हाकेंनी शरद पवारांवर केली आहे. ओबीसींबद्दल खरंच तळमळ असती तर शरद पवारांनी यात्रा काढली नसती, तर विरोधक म्हणून सरकारवर तुटून पडले असते, असं देखील हाके म्हणाले आहेत. यामुळे आता हाकेंनी केलेल्या या टीकेला नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. हाकेंच्या टीकेला आता शरद पवार यांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून काय प्रत्युत्तर दिलं जातं हे पाहणं महत्चाचं असणार आहे.
शरद पवारांना प्रश्न
शरद पवार जे बोलतात त्याच्या उलट करतात ही त्यांची ख्याती आहे. म्हणजे पवारांनी ओबीसींसाठी मोर्चा काढला, याचा उलटा अर्थ म्हणजे त्यांना जरांगेंना मदत करायची आहे. ती कशी? जरांगे २९ अॅागस्टला मुंबईला मोर्चा काढत आहेत. त्यांच्याविरोधात ओबीसींनी एकदिलानं ताकद दाखवू नये, असं हाके म्हणाले आहेत. ओबीसींमध्ये फुट पडावी. जरांगेंचा मोर्चा यशस्वी व्हावा. यासाठी शरद पवारांनी ही यात्रा काढली आहे का? हा मोर्चा काढावा म्हणून कोणता ओबीसी नेता त्यांच्या दारात गेला होता? याचं उत्तर शरद पवारांनी दिलं पाहिजे, असे प्रश्न लक्ष्मण हाके यांनी शरद पवारांना विचारले आहेत.
मंडल यात्रा
महाराष्ट्रात 1992 नंतर शरद पवारांच्या कार्यकाळात मंडल आयोग लागू झाला, हे सांगण्यासाठी राष्ट्रवादी शरदचंद्र पक्षाच्या वतीने मंडल यात्रेचा प्रारंभ करण्यात आला आहे. ही यात्रा ५२ दिवस सुरू राहणार असून राज्यातील कानाकोऱ्यात जाणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून शरद पवार यांनी ५० वर्षांत महाराष्ट्रात ओबीसी समाजासाठी काय केले हे सांगण्यात येणार आहे.
हेही वाचा : हाय स्पीड ‘थार’चा थरार ; दोन जणांना चिरडले, एक गंभीर जखमी





