Baramati News : अवकाळीचा फटका…! डोर्लेवाडीत नागरिकांच्या घरात शिरले पावसाचे पाणी

डोर्लेवाडी : पुणे जिल्ह्यात गेल्या सहा ते सात दिवसांपासून जोरदार अवकाळी पाऊस कोसळत आहे. बारामती तालुक्यात देखील पाऊसाने हजेरी लावली असून, मुसळधार पाऊस कोसळत आहे. पावसामुळे तालुक्यातील डोर्लेवाडी गावातील नागरिकांच्या घरात पावसाचे पाणी शिरले असून, पहिल्याच पावसात पूर परिस्थिती निर्माण झाली आहे.
पावसाचे पाणी घरात शिरण्याला जलसंपदा विभाग कारणीभूत असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. जलसपंदाच्या अंतर्गत असलेल्या चारीची साफसफाई वेळेवर न केल्याने मोठ्या प्रमाणात झालेल्या पावसाचे पाणी नदीला जाणाऱ्या चारीतून बाहेर आल्याने नागरिकांच्या घरामध्ये शिरले आहे.
तसेच डोर्लेवाडी ग्रामपंचायतने देखील दुर्लक्ष केल्याने पावसाच्या पाण्याचा फटका मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना बसला आहे. घरात पावसाचे पाणी गेल्याने सर्व संसार उपयोगी वस्तू पाण्यात गेल्या आहेत. सर्व धान्य भिजले असल्याने मोठ्या प्रमाणात नागरिकांचे नुकसान झाले आहे. यामुळे शासनाच्या वतीने या नागरिकांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करून झालेल्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करून नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
तालुक्यात जोरदार
बारामती तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस कोसळत असल्याने तालुक्यातील सर्व ओढे, नाले, बंधारे तुडुंब भरून वाहू लागले आहेत. तसेच बारामती तालुक्यातून वाहणारी कऱ्हा नदीला देखील मोठ्या प्रमाणावर पाणी आले आहे.





