Weather update : भारतीय हवामान विभाग (आयएमडी) यांनी 20 एप्रिल 2026 रोजी जाहीर केलेल्या पाच दिवसीय अंदाजानुसार, राज्यात 20 ते 24 एप्रिलदरम्यान हवामानात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. या कालावधीत वादळी वारे, विजांचा कडकडाट, गारपीटसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि कोकणातील अनेक जिल्ह्यांना विशेष सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून, राज्य आपत्कालीन कार्य केंद्राच्या वतीने नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. मंगळवार सकाळपासूनच मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये ढगाळ वातावरण तर काही भागांमध्ये मेघगर्जना पाहायला मिळाली. ही स्थिती राज्यातील 18 जिल्ह्यांमध्ये पाहायला मिळणार आहे. अतीप्रमाणातील बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे पावसास पूरक वातावरणनिर्मिती होत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. सतर्कतेचा इशारा अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून बाष्पयुक्त वारे प्रवाही होत असतानाच या वाऱ्यांचा प्रभाव पुढील तीन ते चार दिवसांत वाढणार असल्यामुळे रायगड, पुणे, कोल्हापूरसह 18 जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. प्रशासनासाठी सूचना ग्रामपंचायत, पोलीस आणि आरोग्य विभागांनी तातडीने जनजागृती मोहीम राबवावी. रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि आपत्कालीन पथके सतर्क ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. शाळा, सभागृह आणि सार्वजनिक इमारती तात्पुरत्या निवाऱ्यासाठी खुल्या ठेवाव्यात. हवामान खात्याचे अद्ययावत इशारे गावपातळीपर्यंत त्वरीत पोहोचवण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत. शेतकरी आणि आयोजकांसाठी विशेष इशारा शेतकऱ्यांनी वीज आणि वादळी वाऱ्यांच्या काळात शेतातील कामे टाळावीत. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणी कामकाज तात्पुरते थांबवावे. तसेच यात्रा, धार्मिक कार्यक्रम आणि मोठ्या गर्दीचे कार्यक्रम पुढे ढकलण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तसेच राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता केवळ अधिकृत सूचनांचे पालन करावे, असे स्पष्ट करण्यात आले आहे. नागरिकांसाठी महत्त्वाच्या सूचना विजांचा कडकडाट सुरू होताच तात्काळ सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. झाडाखाली उभे राहणे, मोकळ्या शेतात थांबणे किंवा पाण्याजवळ जाणे टाळावे. तसेच लोखंडी वस्तूंपासून दूर राहावे. अशा परिस्थितीत मोबाईल किंवा इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा वापर टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे. हेही वाचा : Vijay Deverakonda And Shouryuv: नानीकडून पहिला क्लॅप; विजय देवरकोंडाच्या नव्या चित्रपटाची दमदार सुरुवात