हिंगोलीत मान्सूनपूर्व पावसाचा तडाखा; हिवरखेडा येथे विजेच्या धक्क्याने गायीचा मृत्यू

हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात काल मध्यरात्री मान्सूनपूर्व ढगफुटीसदृश पावसाने हाहाकार माजवला. यामुळे भुईमूग उत्पादक शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असताना, सेनगाव तालुक्यातील हिवरखेडा गावात एका शेतकऱ्याच्या गायीचा विजेच्या धक्क्याने दुर्दैवी मृत्यू झाला. या घटनेमुळे शेतकऱ्याचे अंदाजे 50,000 रुपयांचे नुकसान झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 23 मे रोजी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास मुसळधार पावसाला सुरुवात झाली. यावेळी हिवरखेडा येथील शेतकरी अश्रूजी धोत्रे यांची 5 वर्षीय तांबड्या रंगाची गाय घराकडे येत असताना गावातील ग्रामपंचायतीने उभारलेल्या एलईडी लाईटच्या खांबाला स्पर्श झाला. या खांबात वीजप्रवाह उतरल्याने गायीला करंट लागला आणि तिचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने गावात खळबळ उडाली आहे.
पंचनामा झाला, पण नुकसान भरपाईबाबत संभ्रम –
आज सकाळी गावचे तलाठी गौसखान पठाण यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. मात्र, साखरा येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. देवकर यांनी महावितरणकडे गुन्हा दाखल केल्यानंतरच पंचनामा करू, असे सांगितले आहे. यामुळे नुकसान भरपाईबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. ग्रामस्थांनी शेतकरी अश्रूजी धोत्रे यांना कोणताही अटकळी न लावता तातडीने नुकसान भरपाई देण्याची मागणी प्रशासनाकडे केली आहे.
या घटनेमुळे हिवरखेडा गावात प्रशासनाविरोधात नाराजी पसरली आहे. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे आधीच नुकसान झाले असताना, अशा दुर्घटनेने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. प्रशासनाने तात्काळ पावले उचलून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.





