Unseasonal Rain : राज्यातील ठाणे जिल्ह्यासह कल्याण- डोंबिवली, नाशिक, नंदूरबार, विदर्भात सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाने थैमान घातल्याची घटना गुरुवारी सायंकाळी घडली. त्यामुळे ठिकठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले आहे. ठिक-ठिकाणी घरांचे पत्रे उडाले आहेत. (Unseasonal Rain) तर यवतमाळ येथील उमरखेड तालुक्यातील दराटी येथे वीज पडून श्रीनिवास राठोड (45) या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. नंदुरबार जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली असून धडगाव तालुक्यातील काकडदा आणि खामला परिसरात मुसळधार पाऊस सुरु होता. (Unseasonal Rain) वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे रस्त्यांना नदीचे स्वरूप आले आहे. नंदुरबार जिल्ह्यात होत असलेल्या पावसामुळे काढून ठेवलेल्या पिकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. मात्र, उकाड्यापासून हैराण झालेल्या नागरिकांना काहीसा दिलासा मिळत असला तरी शेतकऱ्यांना तो तडाखा देणारा ठरला आहे. (Unseasonal Rain) राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेच्या ठिकाण असलेल्या तोरणमाळला जोरदार पावसाने हजेरी लावली. इगतपुरीतही दुसऱ्या दिवशी अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. इगतपुरी, घोटी, तळेगाव, गावठा, काळुस्ते परिसरात जोरदार हवा आणि विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला आहे. (Unseasonal Rain) नाशिकच्या बागलाण तालुक्याला अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला आहे. अचानक आलेल्या पावसामुळे काढणीला आलेला आणि शेतात काढून ठेवलेला कांदा वाचवण्यासाठी शेतकऱ्यांची तारांबळ उडाली आहे. (Unseasonal Rain) पालघरच्या जव्हार, मोखाडा तालुक्यात अवकाळी पावसाची दमदार हजेरी झाली आहे. पालघरच्या पूर्व भागात सोसाट्याच्या वाऱ्यासह अचानक आलेल्या वादळामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. (Unseasonal Rain)