पिरंगुट : पिरंगुट व लवळे परिसरात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे शेतकर्यांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले असून, काढणीला आलेली पिके अक्षरशः उद्ध्वस्त झाली आहेत. आधीच उत्पादन खर्चाच्या ओझ्याखाली दबलेल्या शेतकर्यांवर या नैसर्गिक आपत्तीमुळे दुहेरी संकट ओढवले आहे. गेल्या काही दिवसांपासून अचानक बदलणार्या हवामानामुळे परिसरात मुसळधार पाऊस आणि गारपीट झाली. या पावसामुळे शेतात काढणीस तयार असलेला कांदा पूर्णपणे भिजला असून सडण्याची भीती निर्माण झाली आहे. कष्टाने उभे केलेले पीक काही तासांतच वाया जात असल्याने शेतकरी हतबल झाले आहेत. या नुकसानीची दखल घेत कृषी विभागाने तत्काळ हालचाल करत पंचनामे सुरू केले आहेत. कृषी अधिकारी अश्विनी चिकनकर यांनी नुकसानग्रस्त शेतांमध्ये प्रत्यक्ष भेट देत परिस्थितीचा आढावा घेतला व पंचनामे केले. या वेळी शेतकरी राजाभाऊ वाघ, लक्ष्मण निकटे, मनोहर पवळे, चंद्रकांत चोरघे, अमित निकटे, संतोष पवळे, सदाशिव निकटे, बाळकृष्ण निकटे, हनुमंत राऊत, बबन पवळे, सुशील वाघ, ज्ञानेश्वर वाघ, नथू पवळे आदी शेतकरी उपस्थित होते. निसर्गाच्या सततच्या लहरीपणामुळे शेती व्यवसाय अधिकच अस्थिर होत असून शेतकर्यांवर उपासमारीची वेळ येत असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. आधीच खर्च वाढला, त्यात पिकांचे नुकसान झाले. आता जगायचे कसे? असा आर्त सवाल शेतकरी उपस्थित करत आहेत. शासनाने तातडीने नुकसानभरपाई जाहीर करावी, पीकविमा योजनांचा लाभ तत्काळ द्यावा तसेच शेतमालाला हमीभाव देऊन शेतकर्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सर्व शेतकर्यांनी एकमुखाने केली आहे.