शिवसेना शिंदे गटात अस्वस्थता; मंत्रिमंडळ विस्तारानंतर 4 बडे नेते नाराज, एकाचा राजीनामा…

Maharashtra Politics: फडणवीस सरकारचा पहिला मंत्रिमंडळ विस्तार रविवारी नागपुरात झाला. 33 कॅबिनेट व 6 राज्यमंत्र्यांनी शपथ घेतली. यात भाजपचे 19 (16 कॅबिनेट व 6 राज्यमंत्री) , शिंदेसेनेच्या 11 (9 कॅबिनेट व 2 राज्यमंत्री) व राष्ट्रवादीचे 9 मंत्र्यांचा (8 कॅबिनेट व 1 राज्यमंत्री) समावेश आहे. जुन्या 16 मंत्र्यांना पुन्हा संधी देण्यात आली, तर 19 नवे चेहरे घेण्यात आले आहेत. 12 जणांना वगळण्यात आले आहे. मुख्यमंत्री व दोन उपमुख्यमंत्र्यांसह मंत्र्यांची संख्या 42 झाली. फक्त 1 जागा रिक्त आहे.
या मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेनेतील काही बडे नेते नाराज आहेत. त्यामध्ये अब्दुल सत्तार, तानाजी सावंत, दीपक केसरकर, विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे यांच्या नावांचा समावेश आहे. या नेत्यांमधून नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, मंत्रिपदासाठी इच्छूक असलेल्या पवनी विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिपद न मिळाल्याने त्यांनी काल उघड नाराजी व्यक्त केली होती. तसेच त्यांनी आपल्या शिवसेना उपनेते पदाचा राजीनामा देखील दिला. ज्यांचे पक्षात काहीच योगदान नाही अशांना देखील मंत्रिपद मिळाले, ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत, त्यांना देखील मंत्रिपद मिळाले, जर मला जनतेला न्याय देता येत नसेल तर पदावर राहून काय उपयोग असा सवाल नरेंद्र भोंडेकर यांनी केला आहे.
भोंडेकर यांच्याप्रमाणाचे विजय शिवतारे, प्रकाश सुर्वे, दीपक केसरकर आणि तानाजी सावंत हे देखील नाराज असल्याची चर्चा आहे, विजय शिवतारे यांनी उघड नाराजी व्यक्त केली आहे. विश्वासात न घेता मंत्रिमंडळ विस्तार झाला, आता आडीच वर्षांनी जरी मंत्रिपद मिळाले तरी मी घेणार नाही असे त्यांनी म्हटले आहे. तर दुसरीकडे प्रकाश सुर्वे देखील नाराज आहेत.
तानाजी सावंत यांच्याकडे गेल्यावेळी आरोग्य खाते होते. मात्र यावेळी त्यांना मंत्रिमंडळातून डच्चू मिळाला आहे. त्यामुळे ते नाराज असल्याची माहिती समोर येत आहे. मंत्रिपद न मिळाल्यामुळे तानाजी सावंत नाराज झाले आहेत. नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनाला न थांबता ते पुण्यातील बालाजी नगर येथील कार्यालयात परतले आहेत. माध्यमांसमोर येण्यासाठी तानाजी सावंत यांनी नकार दिला आहे. मंत्रिमंडळ विस्तारात स्थान न मिळाल्याने शिवसेना शिंदे गटातील नेते नाराज आहे, आता त्यांची नाराजी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कशी दूर करणार हे पाहाणे महत्त्वाचे ठरणार आहे.




