– दिवसभरात सुमारे दिड ते दोन हजार अर्ज दाखल – सर्वच पक्षांत बंडखोरी; अपक्ष म्हणून अर्ज दाखल पुणे – महापालिका निवडणुकीसाठी अर्ज भरण्यासाठी मंगळवारी शेवटच्या दिवशी पुण्यात अभूतपूर्व गोंधळ पहायला मिळाला. महाविकास आघाडीत शेवटच्या दिवसापर्यंत सुरू असलेली चर्चा, भाजप आणि शिवसेनेचे महायुतीचे जागा वाटपाचे दुपार पर्यंत सुरू असलेले चर्चेचे गुऱ्हाळ आणि मनसे आणि शिवसेनेत कोणत्या जागा लढायच्या यावरून झालेला तिढा तर दोन्ही राष्ट्रवादीकडून शेवटच्या मिनिटांपर्यंत भाजप मधील नाराजांना संधी देण्यासाठी आखलेली रणनिती यामुळे कोणत्या पक्षाकडून कोणत्या उमेदवाराला एबी फाॅर्म देण्यात हेच स्पष्ट झाले नाही. तर, राजकीय पक्षांकडेही याची माहिती नाही. या शिवाय, काही ठिकाणी दोन दोन उमेदवारांना एबी फाॅर्म देण्यात आले असून अर्ज माघारीच्या दिवशी नेमका उमेदवार कोण हे स्पष्ट होणार आहे. अखेरच्या दिवशी तब्बल दिड ते दोन हजार अर्ज दाखल झाल्याने महापालिकेची निवडणूक यंत्रणाही कोलमडून पडल्याचे दिसून आले. तिकिट न मिळाल्याने सर्वच पक्षाच्या नाराज झालेल्या अनेक बंडखोरांनी अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज दाखल केले असून अनेकांनी पक्षाचे बोर्ड, बॅनर्स फाडत आणि सोशल मीडियावीर पक्षाच्या कार्यपद्धतीवर जाहीर टिकाही केल्याचे पहायला मिळाले. युतीचा तिढा कायम ? अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असला तरी भाजप आणि शिवसेनेमधील तिढा अकरा वाजेपर्यंत कायम होता. शिवसेनेने दिलेल्या शेवटच्या प्रस्तावाबाबत भाजपकडून कोणताही प्रस्ताव दिला जात नसल्याने भाजपच्या शहर पदाधिकाऱ्यांनी युती तुटल्याचे सांगत पक्षाचे एबी फाॅर्म इच्छूकांना वाटप करण्यास सुरूवात करण्यात आली. त्यानंतर काही वेळातच पुन्हा आमदार विजय शिवतारे आणि पक्षाचे नेते उदय सामंत यांनी पक्षाकडून उमेदवारांना एबी फाॅर्म दिले असले तरी अर्ज माघारी घेण्याच्या अखेरच्या दिवसापर्यंत चर्चा सुरू असून त्यानुसार दोन्ही पक्ष तोडगा काढणार असल्याचे सांगितले. मात्र, शिवसेनेकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे १४२ एबी फाॅर्म पक्षाकडून देण्यात आले आहेत. त्यात, भाजपच्या उमेदवारांच्या समोर शिवसेनेकडून उमेदवार देण्यात आले आहेत. प्रशासकीय यंत्रणा कोलमडली… अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात अर्ज दाखल झाल्याने महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा अक्षरश: कोलमडून पडल्याचे पहायला मिळाले. अर्ज भरण्यासाठी दुपारी तीन पर्यंतची वेळ होती. तर, राजकीय पक्षांकडून सकाळी दहा नंतर एबी फाॅर्म देण्यास सुरूवात झाल्याने भाजप वगळता इतर पक्षांच्या उमेदवारांनी फाॅर्म मिळत असलेल्या ठिकाणी मोठी गर्दी केली होती. ही गर्दी एवढी होती की नक्की कोणाला फाॅर्म दिले आहेत याची नोंदच करता आलेली नसल्याचे काही पक्षांच्या नेत्यांकडून सांगण्यात आले. त्यानंतर हे अर्ज घेऊन ही गर्दी १५ क्षेत्रीय कार्यालयांच्या ठिकाणी अर्ज दाखल करण्यासाठी जमा झाली त्यामुळे दुपारी १२ नंतर या कार्यालयांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ उडाला तर गर्दीवर नियंत्रण आणताना पोलिसांची दमछाक झाल्याचे पहायला मिळाले.