लॉकडाऊनची नियोजनशून्य अंमलबजावणी-सोनिया गांधी
करोना रोखण्याच्या पाऊलांवरून कॉंग्रेसने मोदी सरकारला घेरले

नवी दिल्ली -करोना फैलाव रोखण्यासाठी उचललेल्या पाऊलांवर कॉंग्रेसने गुरूवारी मोदी सरकारला घेरले. देशव्यापी लॉकडाऊनची नियोजनशून्य अंमलबजावणी करण्यात आल्याचे टीकास्त्र कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी सोडले.
कॉंग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून झाली. त्या बैठकीत सहभागी होत सोनियांसह कॉंग्रेसच्या प्रमुख नेत्यांनी मोदी सरकारवर जोरदार शाब्दिक हल्लाबोल केला. सध्याच्या स्थितीत 21 दिवसांचा लॉकडाऊन गरजेचा असू शकतो. मात्र, कुठल्याही नियोजनाअभावी त्याची अंमलबजावणी झाल्याने गोंधळाची स्थिती निर्माण झाली. त्यातून लाखों स्थलांतरित मजुरांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यांना अन्न आणि निवाऱ्याविना मोठी पायपीट करावी लागल्याचे दृश्य व्यथित करणारे आहे.
करोना फैलावाचा सर्वांधिक प्रतिकूल परिणाम गरिबांना भोगावा लागू शकतो. त्यांच्या भल्यासाठी सर्वांनीच एकत्र येण्याची गरज आहे. देशापुढे आरोग्य आणि मानवताविषयक अभूतपूर्व पेच उभा राहिला आहे. त्यामुळे आपल्यापुढील आव्हान मोठे आहे. मात्र, त्यावर मात करण्याचा आपला निर्धार त्याहीपेक्षा मोठा असायला हवा, असे सोनिया म्हणाल्या. करोनाशी लढण्यासाठी सातत्यपूर्ण आणि विश्वसनीय तपासणीला पर्याय नाही. आपले डॉक्टर, परिचारिका आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना सर्वतोपरी पाठिंबा देण्याची गरजही त्यांनी अधोरेखित केली.
करोनाचा मुकाबला करण्यासाठी कॉंग्रेस पक्ष देशाबरोबर आहे, अशी ग्वाही माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी दिली. गरिबांना आणि विशेषत: स्थलांतरित मजुरांना मदत न उपलब्ध होण्यावरून कॉंग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी सरकारवर निशाणा साधला. स्थलांतरित मजुरांच्या निवाऱ्याची, अन्नाची व्यवस्था न करता कुठल्याच देशाने लॉकडाऊन केले नाही, असे ते म्हणाले. करोनामुळे उद्भवणाऱ्या आर्थिक संकटाचा मुकाबला करण्यासाठी देशाने सज्ज होण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. बैठकीत प्रियांका गांधी, पी.चिदंबरम, ए.के.अँटनी, गुलाम नबी आझाद, अधिररंजन चौधरी, मल्लिकार्जुन खर्गे, अहमद पटेल हे नेतेही सहभागी झाले.





