पुणे – करोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्या पार्श्वभूमीवर शहरात पोलीस दंडात्मक कारवाई करत आहेत. मागील तीन दिवसांत तब्बल पाच हजार 204 जणांवर कारवाई केली. याद्वारे 25 लाखांचा दंड वसूल केला.
अनलॉकची प्रक्रिया सुरू झाल्यामुळे नागरिकांना अनेक सवलती देण्यात आल्या आहेत. दुकाने, मॉल सुरू झाले आहेत. तसेच, प्रवास करण्याची बंदी हटवली आहे. करोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नागरिकांनी सुरक्षित अंतर व मास्क घालणे या नियमांचे पालन करण्याच्या सूचना प्रशासनाने केल्या आहेत. मात्र, तरीही अनेक ठिकाणी नियमांचे पालन केले जात नसल्याचे दिसून येत आहे.
तसेच, अनेकजण मास्क न लावता बाहेर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे पोलिसांकडून मास्क न घालणाऱ्यांवर कारवाईला पुन्हा सुरुवात केली आहे. मागील तीन दिवसांत पोलिसांनी तब्बल 5 हजार 204 जणांवर कारवाई केली. त्यांच्याकडून 25 लाखांपेक्षा जास्त दंड वसूल केला. यापुढे देखील ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.