पुणे – करोना पार्श्वभूमीवर राज्यातील आदिवासी विकास विभागाच्या निवासी आश्रमशाळा सुरू करण्यात आलेल्या नाहीत. यामधील विद्यार्थ्यांना शाळेपर्यंत आणण्याऐवजी शिक्षण विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी “अनलॉक लर्निंग’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासाठी 28 कोटी 59 लाख रुपये खर्च येणार आहे.
निवासी आश्रमशाळांमध्ये पहिल्या सत्रात अनौपचारिक शिक्षण सुरू ठेवणे आव्हानात्मक आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी नियोजन आराखडा तयार करून शिक्षणाच्या मूलभूत संकल्पना अंमलात आणण्यासाठी नियोजन केले आहे.
आराखडा परिपूर्ण पद्धतीने अंमलात आणण्यासाठी शैक्षणिक, प्रशासकीय, आर्थिक व अंमलबजावणी विषयक घटकांवर काम करणाऱ्या 11 उपसमित्यांच्या मदतीने संपूर्ण नियोजनाची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
आश्रमशाळांमध्ये दर्जेदार शैक्षणिक प्रयोग केलेले अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, अभ्यासक यांचा या समितीत समावेश होता. 1 ते 11 जूनदरम्यान दैनंदिन व्हिडीओ कॉन्फरन्सींगद्वारे चर्चा व नियोजन करण्यात आले. “शाळा बंद, पण शिक्षण चालू’ या योजनेस अनुसरून “अनलॉक लर्निंग’ हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.