प्रभात वृत्तसेवा पुणे – सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील प्राध्यापकांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठीय व महाविद्यालयीन अध्यापक संघटनेने’ (स्पुक्टो) पुकारलेले बेमुदत धरणे आंदोलन अधिक तीव्र झाले आहे. आंदोलनास सहा दिवस झाले असून प्रशासन आणि संघटना यांच्यातील चर्चा निष्फळ ठरल्याने कोंडी कायम आहे. या पार्श्वभूमीवर आता सोमवारी (दि. २५ ) कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या उपस्थितीत होणाऱ्या बैठकीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. विद्यापीठातील नवीन विभागांमध्ये विद्यापीठ फंडातून नियमित वेतन श्रेणीवर अनेक प्राध्यापकांच्या नेमणुका करण्यात आल्या होत्या. या प्राध्यापकांचा सुरुवातीचा पाच वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर त्यांना सेवानिवृत्तीपर्यंत सेवा सातत्य देण्याचा धोरणात्मक निर्णय व्यवस्थापन परिषदेने यापूर्वीच घेतला आहे. मात्र, या निर्णयाची प्रत्यक्ष अंमलबजावणी करताना प्रशासनाकडून जाणीवपूर्वक तांत्रिक अडथळे निर्माण केले जात असल्याचा आरोप संघटनेने केला आहे. याशिवाय, नियुक्तीपासून लागू असलेल्या अंशदायी भविष्य निर्वाह निधी संदर्भात विद्यापीठाने नुकतेच एक वादग्रस्त परिपत्रक जारी केले आहे. यानुसार जमा होणारी रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने प्राध्यापकांचे आर्थिक नुकसान होत आहे. या निर्णयालाही संघटनेने कडाडून विरोध केला आहे. यासंदर्भात ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याची भूमिका स्पुक्टोने घेतली आहे. यामुळे उद्याच्या बैठकीतील निर्णयावर आंदोलनाची दिशा ठरणार आहे.