पिंपरी, (प्रतिनिधी) – चिंचवड विधानसभा मतदार संघात अजित पवार राष्ट्रवादी पक्षाकडून इच्छूकांची संख्या दिवसेंदिवस वाढत असतानाच आता हे सर्व इच्छूकांनी बैठक घेत, हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्याला कसा येईल, यावर आपले लक्ष केंद्रीत करायला सुरूवात केली आहे. त्याकरिता या सर्व इच्छूकांनी आता चिंचवड मतदार संघ आपल्या पदरात पाडून घेऊ. त्यानंतर कोणी निवडणूक लढायची ते ठरवू, अशी भूमिका घेतली आहे. राष्ट्रवादीच्या पदाधिकार्यांची आज (दि.4) वाकडमधील एका हॉटेलमध्ये संयुक्त बैठक पार पडली. त्यामध्ये हा निर्णय घेण्यात आला आहे. या बठकीला माजी नगरसेवक मोरेश्वर भोंडवे, नाना काटे, मयूर कलाटे, प्रशांत शितोळे यांच्यासह अनेकपदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. याबाबत मयूर कलाटे म्हणाले की, या शहराचा खर्या अर्थाने अजित पवार यांनी विकास केला आहे. त्यामुळे स्थानिक परिस्थिती आणि आगामी विधानसभा निवडणूक याबाबत आम्ही अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहोत. या चर्चेतून ठरलेला निर्णय आम्ही प्रसारमाध्यमांना कळविणार आहोत. हे शहर अजित पवार यांनी घडविले आहे. त्यामुळे हे शहर त्यांच्याकडेच राहिले पाहिजे, अशी ंआमची आग्रही मागणी आहे. भाजपच्या उमदेवाराचा प्रचार करणार नाही नाना काटे म्हणाले की, आमच्या मागणीला यश आल्यास आम्ही सर्व जण या मतदार संघातील राष्ट्रवादीच्या उमेदवाराच्या पाठिशी ठामपणे उभे राहणार आहोत. मात्र, आम्ही विधानसभा निवडणुकीत भाजपच्या उमेदवाराचा प्रचार करणार नाही,असे ठरविले आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातील राष्ट्रवादीच्या सर्व इच्छुकांसह आजी माजी नगरसेवक व पदाधिकार्यांच्या उपस्थितीत पार पडलेल्या बैठकीत चिंचवड विधानसभा मतदार संघ हा राष्ट्रवादीला मिळावा, असा ठराव मंजूर करण्यात आला आहे.