Jamkhed News : साकत परिसरात गणेशोत्सवाचा अनोखा उत्साह! बिग बॉस फेम अभिजित बिचुकले व अभिनेत्री शमिका पालवे यांच्या हस्ते बाप्पाची आरती
Jamkhed News : आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि आरतीचा लाभ घेण्यासाठी साकतसह पिंपळवाडी, हनुमानवाडी व कडबनवाडी येथील ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती.

जामखेड : साहित्यरत्न प्रतिष्ठानचे मुख्य सचिव अमोल पुलवळे यांच्या संकल्पनेतून आणि विशेष पुढाकारातून साकत व परिसरात यंदाचा गणेशोत्सव अत्यंत दिमाखदार आणि उत्साही वातावरणात साजरा होत आहे. महाराष्ट्राचे बहुचर्चित ‘बिग बॉस’ फेम डॉ. अभिजित बिचुकले आणि प्रसिद्ध अभिनेत्री शमिका पालवे यांनी काल रात्री साकत परिसरातील विविध गणेशोत्सव मंडळांना प्रत्यक्ष भेट दिली. या वेळी दोन्ही मान्यवरांच्या शुभहस्ते श्री गणरायाची भावपूर्ण महाआरती करण्यात आली.
आपल्या लाडक्या कलाकारांना प्रत्यक्ष पाहण्यासाठी आणि आरतीचा लाभ घेण्यासाठी साकतसह पिंपळवाडी, हनुमानवाडी व कडबनवाडी येथील ग्रामस्थ आणि तरुण कार्यकर्त्यांनी अलोट गर्दी केली होती. या प्रसंगी पिंपळवाडी, हनुमानवाडी, कडबनवाडी आणि साकत येथील गणेशोत्सव मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वतीने डॉ. अभिजित बिचुकले व अभिनेत्री शमिका पालवे यांचा शाल, श्रीफळ व फेटा बांधून अत्यंत उत्साहात भव्य नागरी सत्कार करण्यात आला.
याच कार्यक्रमाचे औचित्य साधून भारतीय जनता पार्टी (भाजपा) किसान मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी डॉ. भगवान मुरूमकर यांची निवड झाल्याबद्दल साहित्यरत्न प्रतिष्ठानच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा भेट देऊन त्यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
हा संपूर्ण दौरा यशस्वी करण्यासाठी साहित्यरत्न प्रतिष्ठानचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने मैदानात उतरले होते. या प्रसंगी प्रमुख उपस्थितीत झुंबर पुलवळे, नामदेव पुलवळे, पत्रकार सुनील पुलवळे, जयेश घोडेस्वार, मनोज पुलवळे, बाळू वराट, ज्ञानदेव पुलवळे, प्रशांत पुलवळे आणि चिकू पुलवळे यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या अभूतपूर्व सोहळ्यानंतर साहित्यरत्न प्रतिष्ठानच्या वतीने कृतज्ञता व्यक्त करण्यात आली. “पिंपळवाडी, हनुमानवाडी, कडबनवाडी आणि साकत येथील गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी पाहुण्यांना व आम्हाला दिलेला हा मान-सन्मान आणि दाखवलेले आपुलकीचे प्रेम खरंच मनाला स्पर्शून जाणारे आहे. हेच स्नेहाचे आणि प्रेमाचे नाते भविष्यातही असेच कायम राहो,” अशी भावना साहित्यरत्न प्रतिष्ठानच्या वतीने व्यक्त करण्यात आली.





