केंद्रीय मंत्र्याच्या पत्नीचे डेंग्यूमुळे निधन; उपचारादरम्यान घेतला अखेरचा श्वास

Jual Oram Wife Death | केंद्रीय मंत्री जुआल ओरम यांच्या पत्नी झिंगिया ओरम यांचे डेंग्यूमुळे निधन झाले आहे. त्या 58 वर्षांच्या होत्या. ओडिशामध्ये एका खासगी रुग्णालयात त्यांच्यावर मागील काही दिवसांपासून उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. केंद्रीय आदिवासी व्यवहार मंत्री जुआल ओरम यांनाही डेंग्यूची लागण झाली असून त्यांच्यावर उपचारही सुरू आहेत.
ओडिशाचे मुख्यमंत्री मोहन चरण माझी यांनी झिंगिया ओरम यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. ही बातमी ऐकून खूप दु:ख झाले. जुआल यांच्या दीर्घ राजकीय प्रवासात झिंगिया यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. या घटनेमुळे जुआल यांचा लोकसभा मतदारसंघ असलेल्या सुंदरगढमधील लोकांवरही दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मुख्यमंत्र्यांसह कायदामंत्री पृथ्वीराज हरिचंदन, आरोग्यमंत्री मुकेश महालिंग, विधानसभा अध्यक्ष सुरमा पाधी आणि अन्य भाजप नेत्यांनी दिवंगत झिंगिया ओरम यांना श्रद्धांजली वाहिली आहे.
केंद्रीय मंत्री जुआल ओरम कोण?
ओडिशातील सुंदरगढ जिल्ह्यातील एका गरीब आदिवासी कुटुंबात जन्मलेल्या जुआल ओरम यांनी कठीण परिस्थितीत उच्च शिक्षण घेतले. राजकारणात येण्यापूर्वी त्यांनी 6 वर्षे सहाय्यक फोरमॅन म्हणून इलेक्ट्रिकल अभियांत्रिकी पदवी प्राप्त केली. त्यानंतर ओरम यांनी 1989 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला. जुआल हे 1999 ते 2004 या काळात अटलबिहारी वाजपेयी यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. भाजप नेते जुआल ओरम यांनी मोदी सरकार 3.0 मध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
हेही वाचा:
मोठी बातमी ! विठ्ठलभक्तांना आषाढीतही मिळणार फक्त 2 तासात दर्शन ; 110 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर





