भर पावसात रस्त्यावरील खड्डयात अडकली केंद्रीय मंत्रीची गाडी; व्हिडिओ होतोय व्हायरल

Shivraj Singh Chauhan | पावसाळ्यात मोठ्या प्रमाणात रस्त्यावर खड्डे होत असल्याने नागरिकांना याचा त्रास सहन करावा लागतो. सामान्यांसाठी रोजचे हे आव्हान झाले आहे. मात्र आता केंद्रीय मंत्र्यांचीच गाडी पावसामुळे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यात अडकली. सर्व सामान्य व्यक्ती पावसामुळे रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांचा दररोज सामना करतो अशा गोष्टीचा अनुभव केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना आला आहे.
झारखंडमध्ये सोमवारी केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांची गाडी चिखलाच्या खड्ड्यात अडकली. ते जाहीर सभेसाठी जात असताना ही घटना घडली. बहरागोडा शहरातील या घटनेच्या व्हिडीओमध्ये दिसत आहे की, शिवराज चौहान ज्या कारमध्ये प्रवास करत आहेत, ती गाडी पावसात पाण्याने भरलेल्या रस्त्यावर एका मोठ्या खड्ड्यात अडकली आहे.
#WATCH | Jharkhand | Union Minister Shivraj Singh Chouhan’s car today got stuck in a muddy pothole amid rains today in Baharagora where he was for a public rally pic.twitter.com/ZYrZanee9K
— ANI (@ANI) September 23, 2024
यानंतर त्यांचे सुरक्षा कर्मचारी गाडीजवळ पोहोचले आणि त्यांनी परिस्थितीचा अंदाज घेण्याचा प्रयत्न केला. नंतर शिवराज सिंह चौहान गाडीतून बाहेर पडताना दिसत आहेत. शेवटी सुरक्षा रक्षकांनी बरेच प्रयत्न केल्यानंतर गाडी खड्ड्यातून बाहेर काढली.
शिवराज सिंह चौहान झारखंडचे भाजपचे निवडणूक प्रभारी आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात पक्षाच्या प्रचारासाठी ते तेथे गेले होते. शिवराज सिंह चौहान केंद्रीय मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळत असून झारखंडमध्येही त्यांच्यावर जबाबदारी पक्षानं सोपवली आहे.
हेमंत सोरेन सरकारवर टीका
सोमवारी पावसाच्या दरम्यान एका जाहीर सभेला संबोधित करताना शिवराज सिंह चौहान यांनी काळे ढग आणि राज्यातील सत्ताधारी झारखंड मुक्ती मोर्चा पक्ष यांच्यात तुलना केली. ते म्हणाले, “जसे ढग संकटाच्या रूपात आले आहेत, तसेच हेमंत सोरेन सरकार हे या ढगांपेक्षा मोठे संकट आहे. परंतु तरीही तुम्ही बदल घडवून आणण्याचा निर्धार केला हे पाहून आज मी म्हणू शकतो की अंधार संपेल, सूर्य उगवेल. कमळ फुलेल आणि परिवर्तन घडेल.”
दरम्यान, झारखंडमध्ये या वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत. हेमंत सोरेन यांच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारचा पाच वर्षांचा कार्यकाळ जानेवारी 2025 मध्ये संपणार आहे.





