नवी दिल्ली : केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान यांना पाकिस्तानच्या गुप्तचर संस्था आयएसआय (ISI) कडून मोठा धोका असल्याची माहिती समोर आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाला शिवराज सिंह चौहान यांच्यावर हल्ल्याबाबत गुप्तचर इनपुट मिळाल्यानंतर, शुक्रवारी उशिरा रात्री तातडीने भोपाळ आणि दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानांची सुरक्षा वाढवण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, भोपाळमधील 74 बंगला परिसरातील बी-8 निवासस्थानाच्या चारही बाजूंनी पोलिसांनी अतिरिक्त बॅरिकेडिंग केली आहे. याच धर्तीवर दिल्लीतील त्यांच्या सरकारी निवासस्थानीही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्यात आली आहे. केंद्रीय गृह मंत्रालयाने एक पत्र जारी करून शिवराज सिंह चौहान यांची सुरक्षा वाढवण्याचे निर्देश दिले आहेत. या पत्रानुसार, आयएसआय केंद्रीय कृषिमंत्री यांच्याबद्दल माहिती गोळा करत असल्याची विश्वसनीय माहिती मिळाली आहे. केंद्रीय सुरक्षा यंत्रणेच्या सल्ल्यानुसार, मंत्र्यांच्या सुरक्षा व्यवस्थेचा आढावा घेण्यात आला, त्यानंतर ही सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. Z+ सुरक्षा असूनही अतिरिक्त उपाययोजना – शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आधीपासूनच ‘झेड प्लस’ (Z+ श्रेणी) सुरक्षा आहे. तरीही, गृह मंत्रालयाला नव्याने धोक्याचे इनपुट मिळाल्यानंतर केंद्राने मध्यप्रदेशचे पोलीस महासंचालक (DGP), दिल्ली पोलिसांचे विशेष आयुक्त (सुरक्षा) आणि मध्यप्रदेशचे मुख्य सचिव यांना तातडीने सुरक्षा अधिक मजबूत करण्याचे निर्देश पाठवले आहेत. Z + सुरक्षा काय असते? – भारतात झेड प्लस सुरक्षा उच्च श्रेणीची मानली जाते. – झेड प्लस सुरक्षेत 10हून अधिक एनएसजी कमांडो सुरक्षा असते. – सुरक्षेत पोलिसांसोबतच 55 सुरक्षा जवान तैनात केले जातात. – सुरक्षेसाठी असलेला प्रत्येत जवान कमांडो मार्शल आर्ट स्पेशालिस्ट असतो. शिवराज सिंह 4 वेळा मुख्यमंत्री – पहिली टर्म – 29 नोव्हेंबर 2005 दुसरी टर्म – 12 डिसेंबर 2008 तिसरी टर्म -8 डिसेंबर 2013 चोथी टर्म – 23 मार्च 2020 9 जून 2024 पासून कॅबिनेटमंत्री