केंद्रीय गृहमंत्रालयाची अग्निवीरांसाठी मोठी घोषणा; CISF मध्ये आरक्षण जाहीर

नवी दिल्ली – केंद्रीय गृह मंत्रालयाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये माजी अग्निवीरांसाठी दहा टक्के आरक्षण जाहीर केले आहे. या आधी बीएसएफमध्ये असे आरक्षण अग्निवीरांसाठी जाहीर करण्यात आले आहे. केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल कायदा, 1968 अंतर्गत केलेल्या नियमांमध्ये सुधारणा करून ही अधिसूचना जारी करण्यात आली आहे.
माजी अग्निवीरांच्या पहिल्या बॅचच्या उमेदवारांसाठी कमाल वयोमर्यादा पाच वर्षांपर्यंत आणि इतर बॅचच्या उमेदवारांसाठी तीन वर्षांपर्यंत शिथिल असेल, असे मंत्रालयाने म्हटले आहे. माजी अग्निवीरांना भरतीसाठी शारीरिक कार्यक्षमता चाचणीतून सूट दिली जाईल, असेही अधिसूचनेत म्हटले आहे.
केंद्राने गेल्या वर्षी 14 जून रोजी लष्कर, नौदल आणि हवाई दलात 17 ते 21 वयोगटातील तरुणांच्या भरतीसाठी अग्निपथ योजना सुरू केली आहे. ही भरती चार वर्षांच्या अल्प-मुदतीच्या करारावर आहे. चार वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर, प्रत्येक तुकडीतील 25 टक्के नियुक्त्यां नियमित केल्या जाणार आहे.
त्यानंतर ज्यांना निवृत्त केले जाणार आहे त्यांच्यासाठी आता निमलष्करी दलांमध्ये आरक्षण ठेवण्यात आल्याने त्यांना पुर्णवेळ नोकरीची संधी मिळणार आहे. निमलष्करी दलांमध्ये 84 हजार जागा रिक्त आहेत. त्या जागांवर आता प्रशिक्षीत जवान या दलांना यातून मिळू शकणार आहेत.





