Union Cabinet : मोदी सरकारचा मोठा निर्णय, BSNL च्या पुनरुज्जीवनासाठी 89000 कोटींच्या पॅकेजला मंजुरी

नवी दिल्ली – केंद्रीय मंत्रिमंडळाने बुधवारी बीएसएनएलसाठी एकूण 89,047 कोटी रुपयांच्या तिसऱ्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी दिली. या अंतर्गत बीएसएनएल या सरकारी दूरसंचार कंपनीला 4 जी आणि 5 जी स्पेक्ट्रमचे परवाने दिले जाणार आहेत.
देशात 5 जी सेवा खासगी कंपन्यांमार्फत सुरू झाली तरी अजून बीएसएनएलला अनेक ठिकाणी 4 जी सेवेचीही अनुमती दिली गेलेली नाही. त्यासाठी अनेक वेळा आंदोलनेही झाली आहेत.
सरकारी दूरसंचार कंपनीकडे 4 जी आणि 5 जी सेवा नसल्याने या सरकारी दूरसंचार कंपनीचे ग्राहक अन्यत्र वळत आहेत. त्यामुळे बीएसएनएलला मोठीच गळती लागली आहे. पण आता उशिराने का होईना सरकारला जाग आली आहे.
आज बीएसएनएलसाठी एकूण 89,047 कोटी रुपयांच्या तिसऱ्या पुनरुज्जीवन पॅकेजला मंजुरी देण्यात आली आहे. बीएसएनएलचे अधिकृत भांडवल 1,50,000 कोटी रुपयांवरून 2,10,000 कोटी रुपये केले जाणार आहे. पॅकेजमध्ये 46,338.6 कोटी रुपयांच्या प्रीमियम वायरलेस फ्रिक्वेन्सी 700 मेगाहर्टझ बॅंड स्पेक्ट्रमचे वाटप समाविष्ट आहे, विविध वस्तूंसाठी रुपये 531.89 कोटी देण्यात येणार आहेत.





