दुर्दैवी ! बहिणीने जीव धोक्यात घालून दान केलं यकृत; शस्त्रक्रियेनंतर भावाचा मृत्यू

पुणे – मागील काही दिवसांपासून करोना संसर्ग धुमाकूळ घालत आहे. अनेक कुटुंब करोनामुळे उद्धवस्त झाले आहेत. मात्र करोना व्यतिरिक्तही राज्यात अनेक मृत्यू होत आहेत. खेड तालुक्यात होमगार्ड पथकात कार्यरत असलेल्या २२ वर्षीय तरुणाचा कावीळ आजाराने मृत्यू झाला. कुणाल दिलीप पावडे असे तरुणाचे नाव आहे.
काही दिवसांपूर्वीच कुणालला कावीळ आजाराने ग्रासले होते. त्यामुळे त्याला उपचारासाठी पिंपरी चिंचवड येथील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र कुणालची किडणी आणि यकृत खराब झालं असून प्रत्यारोपनासाठी १५ ते २० लाखांचा खर्च डॉक्टरांनी सांगितला होता.
कुणालची प्रकृती पाहता त्याच्या बहिणीने यकृत दान करण्याचा घेतला. त्यानुसार २ जून रोजी ही शस्त्रक्रिया पार पडली. मात्र गुरुवारी कुणालची प्राणज्योत मालवली.
कुणालची घरची परिस्थिती बिकट होती. शस्त्रक्रियेसाठीचा १५ ते २० लाखांचा खर्च परवडणारा नव्हता. मात्र गावातील मित्रांनी आणि गावकऱ्यांनी कुणालच्या शस्त्रक्रियेसाठी पैशांची जमवाजमव केली. सोशल मीडियावर मदतीचा साद घातली. त्यातून ९ ते १० लाख रुपये गोळा झाले.
शस्त्रक्रियेसाठी पैसे गोळा झाल्यानंतर कुणालची बहिण रेणुका महिंद्रा शिंदे हिने यकृत दान केले. पुण्यातील रुबी हॉल रुग्णालयात ही शस्त्रक्रिया पार पडली. मात्र कुणाल शस्त्रक्रियेनंतर शुद्धीवर आलाच नाही. तर बहिण रेणुका सुखरूप आहेत. अखेर गुरुवारी रात्री कुणालचा मृत्यू झाला. त्यामुळे कुटुंबावर शोककळा पसरली आहे.


