जम्मू – जम्मू-काश्मीरमध्ये रविवारी रात्री अनावधानाने ग्रेनेडचा स्फोट झाला. त्यामध्ये लष्कराच्या कॅप्टनसह दोघे मृत्युमुखी पडले. ती घटना पूँछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेच्या (एलओसी) लगत घडली. लष्कराचे पथक गस्त घालत असताना अचानकपणे ग्रेनेडचा स्फोट झाला. त्यामध्ये कॅप्टन आनंद आणि नायब सुभेदार भगवान सिंह जखमी झाले.
त्यांना उपचारासाठी तातडीने हेलिकॉप्टरमधून उधमपूरच्या लष्करी रूग्णालयात हलवण्यात आले. मात्र, त्या दोघांचेही प्राण वाचू शकले नाहीत. आनंद हे बिहारचे, तर सिंह हे उत्तरप्रदेशचे रहिवासी होते. त्या स्फोटात आणखी काही जवान जखमी झाल्याचे वृत्त काही वाहिन्यांनी दिले. मात्र, त्या वृत्ताची पुष्टी होऊ शकली नाही.