नाशिक – नाशिकच्या सटाणा तालूक्यातील लखमापूर येथे गरम तेलाच्या कढईत पडून 6 वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. वैष्णवी पवार असे या मृत चिमुकलीचे नाव आहे. खेळत असताना अचानक गरम तेलाच्या कढईत पडल्याने वैष्णवी भाजली होती. मात्र उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला.
वैष्णवीचे वडिल निंबा पवार हे खाद्य पदार्थ विक्रेते आहेत. ते व्यवसायासाठी लागणारे खाद्य पदार्थ तयार करत होते. मात्र काम झाल्यानंतर त्यांनी गरम तेलाची कढई खाली उतरून ठेवली होती. त्यानंतर ते दुसऱ्या कामात व्यस्त झाले होते. पण तेव्हाच चिमुकली वैष्णवी तेथे आली आणि अनर्थ घडला.
वैष्णवी खेळत असताना अचानक तिचा तोल गेला आणि ती थेट गरम तेलाच्या कढईत जाऊन पडली. ही बाब लक्षात येताच तिच्या वडिलांनी तिला बाहेर काढले. त्यानंतर तिला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले. मात्र जास्त भाजल्याने अखेर उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दरम्यान, या दुर्दैवी घटनेनंतर अनेकजण हळहळ व्यक्त करत आहे.