विधानभवन परिसरात भजी तळत विरोधकांचे आंदोलन; बेरोजगारीविरोधात केला सरकारचा निषेध

Nagpur Vidhanbhavan: विधिमंडळाच्या अधिवेशनाच्या सातव्या दिवशी विरोधकांनी बेरोजगाराचा प्रश्न उपस्थित करत सरकारचा जाहीर निषेध केला आहे. यावेळी सत्ताधाऱ्यांविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. विशेष म्हणजे विरोधकांकडून विधानभवन परिसरात पकोडे तळत आंदोलन करण्यात आले आहे. ‘पेपरफुटी झाली, काय दिवे लावले’, ‘भरतीची घोषणा, काय दिवे लावले’, ‘बेरोजगारी वाढली, काय दिवे लावले,’ ‘पीएचडीधारकांची थट्टा, काय दिवे लावले’, एक दिवा खोक्यांनी दूसरा दिवा धोक्यांनी अशा घोषणा विरोधकांकडून विधानभवन परिसरात देण्यात आला.
आंदोलनात विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, रवींद्र धंगेकर, सचिन अहिर, सतेज पाटील, रोहित पवार, के. सी. पाडवी आदींचा सहभाग होता. सर्वच परीक्षांमध्ये पेपरफुटी वाढली आहे. सरकार यावर कुठलीही कारवाई करत नसल्याचे चित्र आहे. मोदींची गॅरंटी म्हणून सरकारचे मंत्री सांगतात तशी गॅरंटी बेरोजगारी हटविण्यासाठी देणार का? सरकार बेरोजगारीच्या मुद्द्यावर गंभीर नाही. रोजगार देण्याऐवजी पकोडे तळण्याचा सल्ला सरकार देत आहे. त्यामुळे पकोडे तळून सरकारचा निषेध करण्यात आल्याचे दानवे यांनी सांगितले.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ‘पीएचडी करून काय दिवे लावणार’ असे वक्तव्य केले होते. त्यावरून त्यांच्यावर बरीच टीका झाली. त्यानंतर त्यांनी दिलगिरी व्यक्त केली. तसेच माझ्या बाजूने हा विषय संपल्याचे जाहीर केले आहे. याशिवाय राज्यात मध्यंतरी अनेक पेपरफुटीची प्रकरण समोर आली. याच मुद्यांवरून सत्ताधाऱ्यांना विरोधकांनी घेरण्याचा प्रयत्न केला आहे.




