बाणेर प्रतिनिधी : बाणेरमधील पॅन कार्ड क्लब रोडवर कायद्याचा अक्षरशः बोजवारा उडाल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. इलेव्हन वेस्ट या व्यावसायिक इमारतीसमोर दररोज शेकडो दुचाकी आणि चारचाकी वाहने थेट पदपथावर आणि रस्त्यावर उभी केली जात असून, पादचाऱ्यांना अक्षरशः रस्त्याच्या मधोमध जीव धोक्यात घालून चालावे लागत आहे. पदपथ हा पादचाऱ्यांसाठी असतो, हा मूलभूत नियमच येथे पायदळी तुडवला जात आहे. दुचाकी वाहने पदपथ गिळंकृत करत आहेत, तर चारचाकी वाहने रस्त्याचा अडथळा बनत आहेत. मात्र, या सर्व प्रकाराकडे बाणेर वाहतूक पोलिसांचे जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत असल्याचा गंभीर आरोप नागरिकांकडून केला जात आहे. अधिक धक्कादायक बाब म्हणजे, चौकांमध्ये उभे असलेले वाहतूक पोलीस किरकोळ दुचाकी व चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाई करताना दिसतात; परंतु त्याचवेळी नियमांची पायमल्ली करणारे पाण्याचे टँकर, सिमेंट मिक्सर, तसेच बांधकाम साहित्य वाहून नेणारे ट्रक व ट्रॅक्टर यांना मात्र मोकळे रान दिले जात आहे. पाणी सांडत जाणारे टँकर असोत किंवा रस्ते अडवणारे जड वाहन यांच्यावर कोणतीही कारवाई होत नसल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. बाणेर परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या या बेशिस्त पार्किंग आणि अनियंत्रित वाहतुकीमुळे नागरिक त्रस्त झाले असून, वाहतूक पोलिसांची कार्यक्षमता आणि निष्पक्षतेवरच प्रश्न उपस्थित होत आहेत. संतप्त नागरिकांचा सवाल: “नियम फक्त सामान्य नागरिकांसाठीच आहेत का? मोठ्या वाहनांवर आणि प्रभावशाली घटकांवर कारवाई का होत नाही?” आता तरी प्रशासन जागे होऊन या बेकायदेशीर प्रकारावर तातडीने कठोर कारवाई करणार का, की बाणेरमध्ये असा ‘मूक कायदा’च सुरू राहणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हेही वाचा :Shilpa Shetty: “फिटनेस आयकॉन शिल्पा शेट्टी ट्रोलच्या निशाण्यावर; कारण काय?”