पिंपरी (प्रतिनिधी) – पिंपरी चिंचवड महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान सुरू झाले आहे. शहरात ३२ प्रभागातून ६९२ उमेदवार रिंगणात आहे. त्यासाठी महापालिकेने जय्यत तयारी केलेली असताना सकाळी मतदान सुरू होताच अभूतपूर्व गोंधळ अनुभवण्यास मिळाला. यंत्रे बंद, बोगस मतदान यामुळे अनेक केंद्रांवर गोंधळ सुरू असल्याचे चित्र पहायला मिळाले. निगडी प्राधिकरण येथील कॅम्प एज्युकेशन स्कूलमधील केंद्रावर अर्ध्यातासाने मशिन सुरू झाले. तोपर्यंत मतदारांनी केंद्रावर गर्दी केली होती. तर एका मशिनमध्ये अ, ब, क, ड हा क्रम चुकीच्या पद्धतीने लावण्यात आला होता. त्यामध्ये पुन्हा दुरुस्ती करण्यात आली. यमुनानगर येथील माता मठ शाळेमध्ये देखील एक तास मशिन उशिरा सुरू करण्यात आले. त्यामुळे मतदारांची गैरसोय झाली. पिंपळे गुरवमध्ये बोगस मतदान होत असल्याचा आरोप विरोधकांनी केला. त्यावेळी पोलिसांनी हस्तक्षेप करत काहींना ताब्यात घेतले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण होते. तर काही केंद्रांबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी ठिय्या आंदोलनाचे हत्यार उपसले. अनेक ठिकाणी मतदारांना मोबाईल ठेवण्याची व्यवस्था करण्यात आली नाही. त्यामुळे अनेक मतदार मतदान न करताच केंद्रांवरून माघारी फिरत असल्याचे चित्र आहे. यावेळी मतदान झाल्यानंतर बोटावर शाई न लावता मार्कर पेनने खून केली जात आहे. ही शाई तात्काळ जात असल्याचा प्रकार अनेक मतदान केंद्रांवर समोर येत आहे. परिणामी यामुळे बोगस मतदान होण्याची शक्यता वाढली आहे. एकूणच सकाळी मतदानाला सुरूवात झाल्यापासूनच शहरातील बहुतांश केंद्रांवर अभूतपूर्व गोंधळ अनुभवायाला मिळत आहे. अशाच पद्धतीने गोंधळ सुरू राहिला तर मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.