पुणे महापालिकेचा अजब निर्णय राज्याचे उपमुख्यमंत्री आणि पुण्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या निधनाला अद्याप दहा दिवसही पूर्ण झाले नसताना पुणे महानगरपालिकेने एक अजब निर्णय घेतल्याचं समोर आलं आहे. पुणे महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून नाच-गाण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय. 15 तारखेला महापालिकेच्या वर्धापन दिनानिमित्त विविध सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आलाय. शोककाळ सुरू असताना अशा स्वरूपाच्या कार्यक्रमांचे आयोजन करणं कितपत योग्य आहे, असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिकेच्या निर्णयाची सध्या चांगलीच चर्चा रंगली आहे. म्हणजे ज्या पुण्याचे पालकमंत्री अजित पवार होते त्याच पुणे महापालिकेला १५ दिवसही त्यांच्या निधनाचे दुःख पाळता आले नाही असेच म्हटले जात आहे. अजितदादा गेल्यानंतर तटकरेंनी गलिच्छ राजकारण केलं जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्ताने कोकणातील राजकीय वातावरण चांगलच तापल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेना शिंदे गटाचे नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्यावर टीका केली आहे. अजित पवार गेल्यानंतर सुनिल तटकरे यांनी गलिच्छ राजकारण केल्याचे रामदास कदम म्हणाले. शरद पवार यांना शह देण्यासाठी सुनील तटकरे यांनी वहिनींना शपथ घ्यायला लावल्याचे तटकरे म्हणाले. अजित पवार यांच्या चितेची आग विझण्याआधी वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडलं. दहा दिवस गेले असते तर काय झालं असतं? असा सवाल देखील रामदास कदम यांनी उपस्थित केला. शरद पवार ताबा घेतील या भीतीने वहिनींना शपथ घ्यायला भाग पाडल्याचा आरोप कदम यांनी केला आहे. तटकरेंनी केलेली ही कृती निंदनीय आहे. महाराष्ट्र त्यांना कधीही माफ करणार नाही असे कदम म्हणाले. सुनील तटकरे विश्वासघातकी. आहे. ज्यांनी ज्यांनी त्यांना मोठ केलं त्यांना संपवण्याचे काम तटकरे यांनी केल्याचा आरोपही रामदास कदम यांनी केला आहे. मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा वाहतूक कोंडी मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर आज पुन्हा एकदा प्रवाशांना मोठ्या वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे. मुंबईकडून पुण्याकडे जाणाऱ्या मार्गिकेवर वाहनांची प्रचंड गर्दी झाली असून, अमृतांजन पूल ते खालापूर टोल नाका या दरम्यान तब्बल 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या आहेत. विशेषतः खोपोली हद्दीत वाहतूक अत्यंत धिम्या गतीने सरकत असल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. उद्या राज्यातील 12 जिल्हा परिषदांसाठी मतदान होणार आहे. यासाठी अनेक खाजगी कंपन्या आणि आस्थापनांनी सुट्टी जाहीर केली आहे. त्यामुळे मतदानासाठी गावी जाणाऱ्या नागरिकांची मोठी गर्दी झाली आहे. शनिवार आणि रविवार असा सलग सुट्ट्यांचा काळ असल्याने मुंबईकर मोठ्या संख्येने पुणे आणि महाबळेश्वरच्या दिशेने पर्यटनासाठी बाहेर पडले आहेत. सध्या एक्सप्रेस वेवर वाहने अक्षरशः रांगत आहेत. तासनतास एकाच ठिकाणी अडकून पडल्याने लहान मुले आणि वृद्ध प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. खालापूर टोल नाक्यावरही वाहनांचा मोठा भार असून टोल भरण्यासाठी बराच वेळ लागत आहे. राष्ट्रवादीत ‘अध्यक्षपदा’चा पेच! अजितदादांच्या निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाचा पेच निर्माण झाला असतानाच, आता ‘अध्यक्षपदा’वरून नवीन वादाला तोंड फुटलंय. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारांनी सुनेत्रा पवारांकडेच अजित पवारांच्या राष्ट्रवादीचं अध्यक्षपद द्यावं, अशी मागणी करत 12 आमदारांबाबत सूचक विधान केलंय… याआधी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतूनही अध्यक्षपद सुनेत्रा पवारांच्याच हाती सोपवण्यात यावं, अशी मागणी करण्यात आली होती..आता प्रश्न उरतो तो म्हणजे, 42 आमदार असणाऱ्या अजितदादांच्या राष्ट्रवादीत जर 30 आमदारांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिलाय.. तर मग विरोधात असलेले ते 12 आमदार कोण? खरतर अजित पवारांच्या निधनानंतर पक्ष विखुरला जाऊ नये यासाठी पक्षातील काही नेत्यांकडून सुनेत्रा पवारांना ताकद दिली जातेय..मात्र सुनेत्रा पवारांना विरोध करणारे ते 12 आमदार नेमके कोण आहेत? सुनेत्रा पवाराचं नेतृत्व त्या 12 आमदारांना का मान्य नाही? ही खेळी पक्षाअंतर्गत सुरु आहे की मित्रपक्षांकडून… हे योग्य वेळी समोर येईलच… राज्यात उकाडा वाढला राज्याच्या किमान तापमानात वाढ झाल्याने थंडी गायब होऊन उकाड्यात वाढ झाली आहे. शिवाय कमाल तापमानाचा पारा सध्या तिशीपार गेला आहे. कोकणात उन्हाचा चटका वाढल्याने भिरा येथे सगळ्यात जास्त ३८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. आज राज्यात अंशतः ढगाळ हवामानासह तापमानातील वाढ आणि उकाडा कायम राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. गेले काही दिवस राज्यात थंडी, पाऊस, ऊन यांचा संमिश्र खेळ पाहायला मिळाला. किमान तापमानात झालेल्या वाढीमुळे गारवा नाहीसा होऊन उन्हाची काहिली भलतीच तापदायक ठरत आहे. हा उकाडा पुढील काही दिवस असाच कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. आता ‘लालपरी’चा प्रवासही महागणार राज्यातील ग्रामीण आणि दुर्गम भागातील जनतेसाठी प्रवासाचे हक्काचे साधन असलेल्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) प्रवाशांना महागाईचा आणखी एक झटका देण्याची तयारी केली आहे. एसटी महामंडळाच्या वाहतूक विभागाने सर्व प्रकारच्या बस सेवांसाठी भाडेवाढीचा प्रस्ताव सादर केला असून, यामुळे सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लागणार आहे. गेल्या काही काळात इंधन (डिझेल) आणि वंगण यांच्या किमतीत मोठी वाढ झालीय. तसेच, बसच्या सुट्ट्या भागांचे दर वाढल्यामुळे गाड्यांच्या देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च आवाक्याबाहेर जात आहे. महामंडळाचे उत्पन्न आणि खर्च यामध्ये मोठी तफावत निर्माण झाली असून ही आर्थिक तूट भरून काढण्यासाठी भाडेवाढ करणे अपरिहार्य असल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. एसटीच्या सर्व प्रकारच्या बस प्रकारात तिकीट दर २ टक्क्यांची वाढ होणार आहे.याबाबत आज अंतिम निर्णय होणार आहे. मालमत्ता खरेदी करण्याचे नियम बदलले उत्तर प्रदेशात मालमत्ता खरेदी करण्याचे नियम बदलले आहेत. जमीन खरेदी करण्यासाठी आता पॅन कार्ड अनिवार्य असेल. पॅन कार्डशिवाय जमिनीची नोंदणी करता येणार नाही. सरकारने यासाठी एक आदेश जारी केला आहे. आदेशात स्पष्टपणे म्हटले आहे की, आता स्थावर मालमत्ता खरेदी करण्यासाठी पॅन कार्ड आवश्यक असेल. नोंदणीसाठी ऑनलाइन अर्जांमध्ये पॅन क्रमांक आणि पडताळणी समाविष्ट करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. संशयास्पद आणि बेनामी व्यवहारांना आळा घालण्यासाठी सरकारने हे पाऊल उचलले आहे, असे सांगण्यात आले आहे. यामुळे खरेदी-विक्रीमध्ये पारदर्शकता वाढेल अशीही अपेक्षा आहे. मेघालयमध्ये अवैध कोळसा खाणीत भीषण स्फोट मेघालय राज्यात एक मोठी दुर्घटना घडलीय. मेघालयातील एका अवैध कोळसा खाणीत स्फोट झाल्यानं 18 जणांचा मृत्यू झालाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केलाय. या घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना 2-2 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आलीय. मेघालयमधील जयंतिया हिल्स जिल्ह्यात कोळसा खाणीत स्फोट झाला. यात जवळपास 18 जणांचा मृत्यू झाला. तर, इतर अनेक जण अडकले असण्याची शक्यता आहे. पोलीस महासंचालक आई नोंगरंग यांनी माहिती दिली आहे. ही घटना थांगस्कू भागात घडली. बचाव कार्य सुरु आहे. आमच्या हाती 16 मृतदेह लागले आहेत. स्फोट झाला तेव्हा खाणीत किती लोक उपस्थित होते, यासंदर्भात माहिती उपलब्ध झाली नाही.असं त्यांनी म्हटलं. दरम्यान, या स्फोटाचं कारण अद्याप समोर आलेलं नाही. राष्ट्रीय हरित प्राधिकरणानं 2014 मध्ये मेघालयात रेट होल कोळसा खाणींवर बंदी घातली होती. जगातील ६८% तेल अमेरिकेकडे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी गुरुवारी एक मोठे विधान केले. अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्याकडे मिळून जगातील सुमारे ६८ टक्के तेल साठा असल्याचा दावा त्यांनी केलाय. ट्रम्प यांनी वॉशिंग्टनमध्ये भाषण करताना हे विधान केले. ट्रम्प म्हणाले की, अमेरिकेने या वर्षी जानेवारीमध्ये व्हेनेझुएला ताब्यात घेतले असून आता ते त्यांच्या तेल संपत्तीचा वापर करतील. व्हेनेझुएलाच्या भयानक आर्थिक परिस्थितीचा संदर्भ देत ते म्हणाले, “ते खूप अडचणीत होते. तरीही त्यांच्याकडे जगातील सर्वात जास्त तेल आहे, ट्रम्प यांनी पुनरुच्चार केला की अमेरिका आणि व्हेनेझुएला यांच्याकडे जगातील ६८ टक्के तेल साठा आहे. बेन स्टोक्सला गंभीर दुखापत इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स आपल्या अफलातून खेळासाठी ओळखला जातो. चेंडू आणि फलंदाजी दोन्हीतून दमदार कामगिरी करत त्याने अनेकदा इंग्लंडला विजय मिळवून दिला आहे. मात्र, सध्या हा स्टार खेळाडू आपल्या खेळामुळे नाही, तर गंभीर दुखापतीमुळे चर्चेत आला आहे. बेन स्टोक्सच्या चेहऱ्यावर भयानक दुखापत झाली असून, त्याला ओळखणंही अवघड झालं आहे. या दुखापतीनंतर स्टोक्सने स्वतः इन्स्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आपल्या तब्येतीबाबत माहिती दिली आहे. सराव सत्रादरम्यान वेगवान चेंडू थेट त्याच्या चेहऱ्यावर आदळला, ज्यामुळे त्याला गंभीर दुखापत झाली. या घटनेनंतर स्टोक्सने सोशल मीडियावर आपला एक धक्कादायक फोटो शेअर केला असून, त्या फोटोमध्ये त्याचा चेहरा ओळखणंही कठीण झालं आहे.हा फोटो समोर येताच क्रिकेटविश्वात खळबळ उडाली. जगभरातील चाहत्यांनी सोशल मीडियावर स्टोक्स लवकर बरे व्हावेत यासाठी शुभेच्छांचा वर्षाव केलाय.