नवी दिल्ली | वर्ष २०२५ हे गुंतवणूकदारांसाठी खऱ्या अर्थाने ‘सुवर्णकाळ’ ठरले आहे. सोन्याच्या किमतीत झालेली वाढ थक्क करणारी असली, तरी चांदीने तर सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. अवघ्या ५ महिन्यांत गुंतवणूकदारांचे पैसे दुप्पट करून चांदीने शेअर बाजार आणि बँकांनाही मागे टाकले आहे. आज २७ डिसेंबर २०२५ रोजी चांदीचा भाव २.३६ लाख रुपये प्रति किलोच्या पार गेला आहे. ५ महिन्यांत संपत्ती दुप्पट जुलै २०२५ मध्ये चांदी १.१८ लाख रुपयांच्या उच्चांकी पातळीवर असताना अनेकांना वाटले होते की आता भाव खाली येतील. मात्र, ज्यांनी त्यावेळी धाडस करून गुंतवणूक केली, ते आज मालामाल झाले आहेत. जुलै ते डिसेंबर या ५ महिन्यांच्या कालावधीत चांदीचे भाव १.१८ लाखांवरून थेट २.३६ लाखांवर पोहोचले आहेत. म्हणजेच केवळ १५० दिवसांत गुंतवणूकदारांची मुद्दल दुप्पट झाली आहे. बँकांमध्ये पैसे दुप्पट होण्यासाठी अनेक वर्षे लागतात, तिथे चांदीने अवघ्या काही महिन्यांत हे करून दाखवले आहे. वर्षभरातील चांदीची कामगिरी (१६३.५% परतावा) ३१ डिसेंबर २०२४ चा भाव: ८९,७०० रुपये/किलो २७ डिसेंबर २०२५ चा भाव: २,३६,३५० रुपये/किलो एकूण वाढ: १,४६,६५० रुपये (१६३.५%) ज्यांनी वर्षाच्या सुरुवातीला ५ लाख रुपये चांदीत लावले होते, त्यांच्या गुंतवणुकीचे मूल्य आज १३.१७ लाख रुपये झाले आहे. तर १० लाख रुपये लावणाऱ्यांकडे आज २६.३ लाखांहून अधिक रक्कम जमा झाली आहे. सोनेही सुसाट: ८० टक्क्यांची कमाई – चांदीच्या झळाळीत सोनेही मागे नाही. २४ कॅरेट सोन्याचा भाव आज १,५०० रुपयांनी वधारून १,४२,३०० रुपये प्रति १० ग्रॅम या ऐतिहासिक पातळीवर पोहोचला आहे. ३१ डिसेंबर २०२४ रोजी सोन्याचा भाव ७८,९५० रुपये होता. वर्षभरात सोन्याने सुमारे ८०.२४% परतावा दिला असून यात ६३,३५० रुपयांची वाढ नोंदवण्यात आली आहे. केवळ ४ दिवसांत ३२ हजारांची झेप अखिल भारतीय सराफा संघाच्या माहितीनुसार, गेल्या चार व्यापारी सत्रांत चांदीमध्ये कमालीची अस्थिरता आणि तेजी दिसून आली. १९ डिसेंबरला चांदी २,०४,१०० रुपयांवर होती, ती अवघ्या चार दिवसांत १५.८ टक्क्यांनी वाढून २.३६ लाखांवर पोहोचली. जागतिक बाजारपेठेतही चांदीने ७५.६३ डॉलर प्रति औंसचा टप्पा ओलांडून नवा इतिहास रचला आहे. तज्ज्ञ काय म्हणतात? एचडीएफसी सिक्युरिटीजचे वरिष्ठ विश्लेषक सौमिल गांधी यांच्या मते, आशियाई बाजारात चांदीने ७५ डॉलरची पातळी ओलांडल्यामुळे स्थानिक बाजारात मोठी तेजी आली आहे. तसेच, प्रवीण सिंह (मीराए एसेट शेअरखान) यांनी सांगितले की, अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हकडून व्याजदरात कपात होण्याची शक्यता आणि कमोडिटी बाजारातील सकारात्मक वातावरणामुळे सोने ४,५३० डॉलर प्रति औंसवर पोहोचले आहे. सुट्ट्यांच्या काळामुळे बाजारात चढ-उतार वाढण्याची शक्यताही त्यांनी वर्तवली आहे.