KRA Jewellers : आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्ताने पुण्यातील ८८ वर्षांची सुवर्ण परंपरा असलेल्या कृष्णा राजाराम अष्टेकर ज्वेलर्स अर्थात केआरए ज्वेलर्सतर्फे समाजातील विविध क्षेत्रांमध्ये निःस्वार्थपणे कार्य करणाऱ्या प्रेरणादायी महिलांचा विशेष सन्मान करण्यात आला. पुणे आणि पिंपरी-चिंचवड येथील केआरएच्या विविध दालनांमध्ये हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता. प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱ्या महिलांची दखल – या उपक्रमात प्रामुख्याने समाजावर सकारात्मक प्रभाव निर्माण करणाऱ्या, मात्र अनेकदा प्रसिद्धीपासून दूर राहून काम करणाऱ्या महिलांचा गौरव करण्यात आला. अंगणवाडी सेविका, आशा वर्कर्स, शासकीय रुग्णालयातील परिचारिका, वृद्धाश्रम व अनाथालयातील सेविका, दिव्यांग मुलांना शिक्षण देणाऱ्या शिक्षिका, स्वयं-सहायता बचत गटांच्या नेत्या, महिलांना कौशल्य प्रशिक्षण देणाऱ्या महिला तसेच घरगुती उद्योजिका यांचा यात समावेश होता. पाच दालनांमध्ये १५ ते २० महिलांचा सन्मान – हा उपक्रम पुण्यातील लक्ष्मी रस्ता-सोन्या मारुती चौक, औंध, सिंहगड रस्ता, सातारा रस्ता आणि पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड येथील दालनांमध्ये आयोजित करण्यात आला. प्रत्येक दालनाच्या व्यवस्थापकांनी त्या त्या भागातील १५ ते २० महिलांची निवड करून त्यांना सन्मानित केले. सन्मानित महिलांना प्रमाणपत्र आणि चांदीची फ्रेम असलेले मानचिन्ह प्रदान करण्यात आले. केआरए संचालकांनी मांडली भूमिका – या उपक्रमाविषयी बोलताना केआरए ज्वेलर्सचे संचालक अतुल अष्टेकर म्हणाले, “समाजात अनेक महिला अव्याहतपणे अतुलनीय काम करीत असतात, मात्र त्यांचे काम कधीही अधोरेखित होत नाही. शांतपणे कार्य करणाऱ्या या महिलांच्या प्रेरणादायी योगदानाची नोंद घेणे आणि त्यांच्या कार्याचा गौरव करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता.” सन्मानित महिलांनीही या कार्यक्रमावेळी भावनिक होत केआरए ज्वेलर्सचे आभार मानले.