China mine blast : चीनमध्ये कोळशाच्या खाणीतील स्फोटात 90 ठार; पीएम मोदींनी व्यक्त केला शोक
China mine blast : दुर्घटना घडली तेंव्हा खाणीमध्ये २४७ कामगार काम करत होते. शनिवारी पहाटेपर्यंत २०१ जणांना बाहेर सुखरुप काढण्यात आले होते.

China mine blast : चीनमधील एका कोळशाच्या खाणीमध्ये झालेल्या स्फोटात किमान 90 जण ठार झाले आहेत. या स्फोटामुळे खाणीत डझनभर जण अडकून पडले असल्याची माहिती सरकारी माध्यमांनी दिली आहे. ही घटना चीनच्या शांक्सी लुशेनयू कोळशाच्या खाणीमध्ये शुक्रवारी संध्याकाळी घडली.
खाणीमध्ये २४७ कामगार काम करत होते –
दुर्घटना घडली तेंव्हा खाणीमध्ये २४७ कामगार काम करत होते. शनिवारी पहाटेपर्यंत २०१ जणांना बाहेर सुखरुप काढण्यात आले होते. खाणीत झालेल्या स्फोटामागील कारणांचा तपास केला जात आहे. मात्र हा स्फोट गॅसमुळे झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. या स्फोटात अवघे ८ जण ठार झाले आणि ३८ जण अडकले असल्याचे प्राथमिक माहितीमध्ये पुढे आले होते. पण नंतर सुधारित आकडा पुढे आल्यावर मृतांची संख्या 90 इतकी असल्याचे स्पष्ट झाले.
खाणीत अडकलेल्या कामगारांची सुखरुप सुटका करण्याचे निर्देश अध्यक्ष शी जिनपिंग यांनी दिले आहेत. तसेच अपघाताच्या कारणांचा शोध घेऊन जबाबदार असलेल्यांवर कारवाई करण्याचे आदेशही जिनपिंग यांनी दिले आहेत.
चीनच्या शांक्सी प्रांतात कोळशाच्या खाणी विपुल प्रमाणात आहेत. या प्रांताचा आकार ग्रीसपेक्षाही मोठा असून संपूर्ण प्रांताची लोकसंख्या ३४ दशलक्ष इतकी आहे. या प्रांतातून वर्षभरात अंदाजे १.३ अब्ज टन कोळशाचे उत्खनन केले जाते.
Saddened by the loss of lives in a mining accident in Shanxi Province in China. On behalf of the people of India, my condolences to President Xi Jinping and the people of China. May the bereaved families find strength in this tragic hour. Praying for the early and safe recovery…
— Narendra Modi (@narendramodi) May 23, 2026
पीएम मोदींनी व्यक्त केला शोक –
चीनमधील शांक्सी प्रांतात झालेल्या खाण अपघातातील जीवितहानीबद्दल अत्यंत दु:ख झाले आहे. भारताच्या जनतेतर्फे मी राष्ट्रपती शी जिनपिंग आणि चीनच्या जनतेप्रती संवेदना व्यक्त करतो. या कठीण प्रसंगी शोकग्रस्त कुटुंबांना बळ मिळो, हीच प्रार्थना. अद्यापही बेपत्ता असलेल्या सर्व लोकांची लवकरात लवकर आणि सुखरूप सुटका व्हावी, हीच ईश्वरचरणी प्रार्थना.





