Thalapathy Vijay : तामिळ अभिनेता आणि राजकारणी थलपथी विजय याच्या शनिवारी संध्याकाळी करूर येथे झालेल्या सभेत चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर देशभरात या घटनेची चर्चा आहे. या घटनेत ३९ जणांचा मृत्यू झाला असून, १०० हून अधिक जण जखमी झाले आहेत. जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. या दुर्देवी घटनेनंतर देशभरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. देशाचे प्रंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील एक्सवरून शोक व्यक्त केला आहे. या घटनेनंतर तमिलगा वेत्री कझगम (टीव्हीके) चे प्रमुख आणि अभिनेता विजय याची प्रतिक्रिया समोर आली आली आहे. या दुःखद घटनेनंतर विजयने सोशल मीडियावरून भावनिक पोस्ट लिहिली आहे. “माझे हृदय तुटले आहे; मी असह्य, अवर्णनीय वेदना आणि दुःखात आहे, जे शब्दात व्यक्त करता येत नाही.” असे विजयने आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे. पुढे विजयने म्हटले आहे की, “करूरमध्ये ज्यांनी आपल्या प्रिय बंधू-भगिनींना गमावले त्यांच्या कुटुंबियांबद्दल मी माझ्या मनापासून संवेदना आणि सहानुभूती व्यक्त करतो. रुग्णालयात उपचार घेत असलेल्या जखमींच्या लवकर पुनर्प्राप्तीसाठी मी प्रार्थना करतो.” तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबियांना मृत्युमुखी पडलेल्या मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकाला १० लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. तर जखमींच्या उपचारांसाठी विशेष व्यवस्था करण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत. रुग्णालयात उपचार घेत असलेल्यांना प्रत्येकी १ लाख रुपयांची मदत स्टॅलिन यांनी जाहीर केली आहे. तसेच मुख्यमंत्र्यांनी या घटनेच्या चौकशीसाठी चौकशी आयोग स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चेंगराचेंगरीच्या घटनेवर व्यक्त केले दुःख एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले, “तामिळनाडूतील करूर येथे एका राजकीय रॅलीदरम्यान घडलेली दुर्दैवी घटना अत्यंत दुःखद आहे. ज्या कुटुंबांनी आपल्या प्रियजनांना गमावले आहे त्यांच्या दु:खात मी सहभागी आहे. या कठीण काळात त्यांना ताकद मिळो अशी प्रार्थना. जखमी पीडित लवकर बरे व्हावेत यासाठी मी प्रार्थना करतो.” घटना कशी घडली? अभिनेता विजय शनिवारी २७ सप्टेंबर रोजी रॅलीसाठी दुपारी १२ वाजता पोहोचणार होता, परंतु त्याला तब्बल सहा तास उशीर झाला. यादरम्यान गर्दी हळूहळू वाढत गेली आणि विजय रॅलीला संबोधित करत असताना गर्दी अनियंत्रित झाली आणि चेंगराचेंगरीला सुरुवात झाली. मोठ्या संख्येने लोक उपस्थित असल्याने उष्णता वाढली. अनेक जण बेशुद्ध पडू लागले, त्यानंतर विजयने भाषण थांबवले आणि त्याच्या प्रचाराच्या बसमधून लोकांच्या दिशेने पाण्याच्या बाटल्या फेकल्या. तेव्हा लोकांनी पाण्याची बाटली घेण्यास बसकडे धाव घेतली. ज्यामुळे चेंगराचेंगरी झाली आणि अनेक लोक त्यात जखमी झाले. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र, या घटनेत अनेकांना आपला जीव गमावावा लागला, तर अनेकजण जखमी झाले. हेही वाचा : जॉन अब्राहम ‘फोर्स 3’मध्ये साऊथ अभिनेत्रीची वर्णी