Pimpri : स्पाइन रोडवरील अनधिकृत पार्किंग

चिखली : चिखली परिसरातील स्पाइन रोडवर टेम्पो, बस, ट्रक यांचे अनधिकृत पार्किंग दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यामुळे रस्ता अरुंद होत असून वाहतूक कोंडी व अपघातांचे प्रमाण सतत वाढत आहे. यामुळे या अनधिकृत पार्किंगवर कारवाई करावी, अशी मागणी अरुण पाडुळे यांनी चिखली पोलिसांकडे निवेदनाद्वारे केली आहे.
अटल बिहारी वाजपेयी उद्यान परिसरात शनिवार आणि रविवारी संध्याकाळी रस्त्याच्या दोन्ही बाजूंनी वाहने उभी राहतात. त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होते. या रस्त्यावरून जाणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिलांना चालणेही कठीण होते. रस्त्याच्या असुरक्षिततेमुळे लहान मुलांसाठीही धोका निर्माण झाला आहे.
या गंभीर समस्येकडे लक्ष वेधत सामाजिक कार्यकर्ते अरुण पाडुळे यांनी उद्यान बाहेरील अनधिकृत पार्किंग तत्काळ हटवावे आणि संबंधित वाहनांवर दंडात्मक कार्यवाही करण्यात यावी, अशी जोरदार मागणी चिखली पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक विठ्ठल साळुंखे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. यावर योग्य ती कारवाई सुरू केली जाईल, असे आश्वासन पोलिसांनी दिले. त्यामुळे स्थानिक नागरिकांकडून या समस्येवर लवकर तोडगा निघेल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.





