Pimpri : देहू-आळंदी रस्त्यावरील अनधिकृत बॅनरमुळे ‘स्थलदर्शक फलक’ झाकला

चिखली : निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात जणू पोस्टरबाजीचा पाऊस सुरू झाला आहे. देहू-आळंदी रस्त्यावरील लक्ष्मी चौकात लावलेला एक अनधिकृत बॅनर आता नागरिकांच्या त्रासाचे कारण ठरत आहे. या बॅनरमुळे रस्त्यावरील महत्त्वाचा स्थलदर्शक फलक पूर्णतः झाकला गेला आहे.
बॅनर इतक्या अयोग्य पद्धतीने लावण्यात आला आहे की, हवेमुळे तो फलकावर झुकून मधोमध मोडला गेला असून, त्यामुळे दिशादर्शक माहिती दिसेनाशी झाली आहे. विशेष म्हणजे, हा बॅनर विद्युत वाहिन्यांच्या अगदी जवळ बांधल्यामुळे संभाव्य शॉर्टसर्किट वा अपघाताची शक्यता वर्तवली जात आहे.
निवडणूक इच्छुक, माजी नगरसेवक किंवा भावी नगरसेवक म्हणून स्वतःचा प्रचार करणाऱ्या मंडळींकडून अशा प्रकारचे बॅनर महापालिकेची परवानगी न घेता बेधडपणे लावले जात आहेत. महापालिका प्रशासनाचे सार्वजनिक सुरक्षेकडे पूर्णपणे दुर्लक्ष होत आहे. वाहतुकीला अडथळा ठरणारे आणि अपघाताला आमंत्रण देणारे हे बॅनर त्वरित काढावेत, अशी तीव्र मागणी स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे केली आहे.
शहराच्या सौंदर्यावर आणि सुरक्षिततेवर बॅनरबाजीचे धोकादायक पडसाद उमटू लागले आहेत. एखादा अपघात घडण्यापूर्वी महापालिकेने अशा अनधिकृत फलकांवर तत्काळ कारवाई करावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.





