भुवनेश्वर : अल्टीमेट खो-खो चा सीझन दोन कटक येथील जवाहरलाल नेहरू इनडोअर स्टेडियमवर सुरू आहे. आजच्या पहिल्या सामन्यात गुजरात जायंट्सने राजस्थान वॉरियर्सचा जोरदार धुव्वा उडवत शानदार विजय नोंदवला. आज झालेल्या तिसऱ्या सामन्यात राजस्थान वॉरियर्सने नाणेफेक जिंकून प्रथम आक्रमण घेत गुजरात जायंट्सला संरक्षण करण्यास आमंत्रीत केले. या सामन्यात गुजरात जायंट्सने राजस्थान वॉरियर्सवर ४१-३० (मध्यंतर २३-१४) असा ११ गुणांनी धुव्वा उडवला.
The @GujaratGiants put up an impeccable performance to secure the win! 💪🏼#UltimateKhoKho #IndiaMaarChalaang pic.twitter.com/UoUf9b9xem
— Ultimate Kho Kho (@ultimatekhokho) December 25, 2023
गुजरातच्या पहिल्या तुकडीने जवळजवळ पावणे तीन मिनिटे संरक्षण केले. या तुकडीत कर्णधार अक्षय भांगरेने उत्कृष्ट संरक्षण केले तर दुसरी तुकडीने जवळजवळ तीन मिनिटे संरक्षण करत ड्रीम रणचा एक गुण सुध्दा वसूल केला. या तुकडीतील सुयश गरगटेने उत्कृष्ट खेळ केला. या पाळीत राजस्थान वॉरियर्सने ३ आकाशीय सूर मारत व १ स्तंभात खेळाडू बाद करत १४ गुण वसूल केले.
दुसऱ्या सत्रात गुजरात जायंट्सने पावणे तीन मिनिटात १२ गुण वसूल करत सामन्याचा निकाल ठरवून टाकला. या पाळीत जगन्नाथ मुर्मूने नाबाद राहत राजस्थानची पडझड थांबवल्यामुळे गुजरातला दुहेरी अंकात बढत घेता आली नाही. दुसऱ्या डावात पुन्हा एकदा राजस्थानने जोरदार मुसंडी मारण्याचा केलेला प्रयत्न गुजरात जायंट्सने उधळून लावला व या सत्रात गुजरातने ड्रीम रणचे दोन गुण वसूल केले तर राजस्थानने १६ गुण मिळवत टक्कर देण्याचा प्रयत्न केला.
शेवटच्या सत्रात गुजरातने जोरदार आक्रमण करत राजस्थानची दमछाक करत सहज विजयाकडे वाटचाल सुरु केली. या सत्रात १८ गुणांची कमाई करत शानदार विजय नोंदवला. या सामन्यात गुजरातच्या शुभम थोरातला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले