किव्ह – रशियाने केलेल्या हल्ल्यात मरण पावलेल्या लहान चिमुरड्यांकडे जगाचे लक्ष वेधण्यासाठी आणि त्यांना श्रध्दांजली वाहण्यासाठी लिव्ह शहराच्या मुख्य चौकात रिकाम्या बाबागाड्या ठेवण्यात आल्या. शिस्तीत लावलेल्या या बाबागाडीत खेळणाऱ्या एकेका चिमुरड्याने आपले प्राण या आक्रमणात गमावले आहेत. एकूण109 रिकाम्या बाबागाडी ठेवण्यात आल्या होत्या.
दोन लहान टेडीही निळ्या पांघरूणात ठेवण्यात आले होते. एक लहान मुलगी युक्रेनचा ध्वज धरून एका बाकावर विमनस्क अवस्थेत बसली होती. युक्रेनच्या पश्चिम भागात असणाऱ्या लिव्ह शहरात हजारो रहिवाशांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. ते आता प्रशासनाकडे आश्रय मागत आहेत.
या बाबागाड्यांकडे पाहून मुळची युक्रेनची असणारी झुराव्हका नतालिया ही नागरिक रशियन मातांना उद्देशून म्हणाली, ती लहान असतात, त्यावेळी ती तुमचीही मुले असतात. ती अशीच बागडत असतात. या बाबागाडीत आता मुले दिसत नाहीत कारण ती मरण पावली आहेत. आपल्या मुलांना लक्षात घेत त्याची तुलना तुमच्या मुलांशी करा… मला कोणतीच बाबगाडी रिकामी पहायची नाही…