ट्रम्प यांच्यासोबत वाद, मात्र झेलेन्स्कींच्या मदतीसाठी ब्रिटन आले पुढे, रशियाविरुद्धच्या लढाईत युक्रेनला दिले तब्बल ‘एवढे’ कर्ज

Volodymyr Zelenskyy | अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदोमीर झेलेन्स्की यांच्यात व्हाइट हाऊसमधील भेटीदरम्यान शाब्दिक वादावादी झाल्याचे पाहायला मिळाले. त्यानंतर झेलेन्स्की यांनी व्हाइट हाऊस सोडावे लागले होते. मात्र, एकीकडे अमेरिकेत झेलेन्स्की यांना योग्य वागणूक मिळाली नाही, तर दुसरीकडे ब्रिटनमध्ये त्यांचे जोरदार स्वागत करण्यात आले.
अमेरिकेच्या दौऱ्यानंतर झेलेन्स्की ब्रिटनमध्ये दाखल झाले. यावेळी ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टार्मर यांनी त्यांचे 10 डाउनिंग स्ट्रीट येथे स्वागत केले. ते 12 युरोपीय देशांच्या राष्ट्राध्यक्ष शिखर परिषदेमध्ये सहभागी होणार आहेत. याशिवाय, या भेटीनंतर ब्रिटनकडून युक्रेनला 2.84 अब्ज डॉलर्स कर्ज देखील देण्यात येणार आहे.
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांनी ब्रिटनकडून देण्यात येणाऱ्या कर्जाबाबत माहिती देण्यात आली आहे. तसेच, या कर्जाचा उपयोग युक्रेनमध्ये शस्त्रास्त्रांच्या उत्पादनासाठी केला जाईल. या कर्जाचा पहिला हप्ता पुढील आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे.
My support for Ukraine is unwavering.
The UK stands with you, @ZelenskyyUa. pic.twitter.com/PsVKyRHKvx
— Keir Starmer (@Keir_Starmer) March 1, 2025
झेलेन्स्की यांनी ट्विट करत ब्रिटनच्या सरकारचे आभार मानले. त्यांनी लिहिले की, हा निधी युक्रेनमधील शस्त्रास्त्र उत्पादनासाठी वापरला जाईल. मी ब्रिटनच्या नागरिकांचे आणि सरकारचे युद्धाच्या सुरुवातीपासून आतापर्यंत दिलेल्या पाठिंब्यासाठी आभार मानतो.
यावेळी झेलेन्स्की यांच्याशी बोलताना कीर स्टार्मर म्हणाले की, ‘मला आशा आहे की तुम्ही रस्त्यावर लोकांना तुमच्यासाठी आनंद व्यक्त करताना ऐकले असेल. हे युनायटेड किंगडमचे नागरिक आहेत, ते तुम्हाला पाठिंबा आहे हे दाखवण्यासाठी डाउनिंग स्ट्रीटवर आले आहेत. युनायटेड किंगडम तुमच्या आणि युक्रेनच्या सोबत खंबीरपणे उभे आहे.’
दरम्यान, ब्रिटनच्या दौऱ्याआधी झेलेन्स्की यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची भेट घेतली. मात्र, या भेटीवेळी दोन्ही देशांच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये वाद झाल्याचे पाहायला मिळाले. युद्धविरामाच्या मुद्यावरून या दोन्ही नेत्यांमध्ये सर्वांसमोरच वाद झाल्याचे दिसून आले





