युक्रेनने नाटोमध्ये सहभागी होण्याचे स्वप्न विसरावे; ट्रम्प यांची स्पष्ट भूमिका

वॉशिंग्टन – अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युक्रेनला अमेरिकेची सुरक्षा हमी किंवा नाटो सदस्यत्व देण्यास नकार दिला. अध्यक्ष झाल्यापासून ट्रम्प यांनी अमेरिकेचे धोरण बदलले आहे. त्यांनी युक्रेन आणि रशियामधील युद्ध संपवण्याची शपथ घेतली आहे आणि युरोपियन मित्र राष्ट्रे युक्रेनच्या सुरक्षेची जबाबदारी घेतील असे म्हटले आहे.
पत्रकारांना संबोधित करताना ट्रम्प म्हणाले की, त्यांना मी जास्त सुरक्षेची हमी देणार नाही. आपण युरोपला ते करू देऊ. युरोप हा त्यांचा शेजारी आहे, पण आम्ही सर्वकाही व्यवस्थित होईल याची खात्री करू. युक्रेनने नाटोमध्ये सामील होण्याचे स्वप्न सोडून द्यावे. मला वाटतं कदाचित म्हणूनच संपूर्ण गोष्ट (युद्ध) सुरू झाली असावी. अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी कोणतीही ठोस कालमर्यादा न देता युक्रेनच्या नाटोमधील सदस्यत्वाला पाठिंबा दिला होता. त्याच्या उलट भूमिका ट्रम्प यांनी घेतली आहे.
दरम्यान, युक्रेन आणि अमेरिका एका मोठ्या आर्थिक करारावर सहमत झाले आहेत. याअंतर्गत, युक्रेन अमेरिकेला दुर्मिळ खनिजे देईल आणि त्या बदल्यात अमेरिका त्याच्या विकास आणि पुनर्बांधणीत मदत करेल, असे युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की यांनी म्हटले आहे. पण युक्रेनला सुरक्षेची हमी देण्याचा मुद्दा या करारात समाविष्ट करण्यात आलेला नाही.
झेलेन्स्कींच्या मागणीवर ट्रम्प यांनी स्पष्ट केले की अमेरिका युक्रेनला सुरक्षेची हमी देणार नाही, हे काम युरोपने करावे. या करारामुळे युक्रेनियन सैन्याला युद्धादरम्यान आवश्यक असलेली लष्करी उपकरणे अमेरिकेकडून मिळण्याचा मार्ग मोकळा होईल. रशियाविरुद्धच्या युद्धात युक्रेनला अमेरिकेची मदत आवश्यक आहे. दोन्ही देशांमधील हा आर्थिक करार शुक्रवारी वॉशिंग्टनमध्ये होऊ शकतो. यासाठी राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की वॉशिंग्टनला जातील आणि तिथे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना भेटतील. या बैठकीत झेलेन्स्की यांना युक्रेनच्या लष्करी गरजांबद्दल ट्रम्प यांच्याशी बोलण्याची संधीही मिळेल.
केलॉग यांनी झेलेन्स्कींशी केली चर्चा –
प्रथम, अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी व्हान्स यांनी म्युनिकमध्ये झेलेन्स्की यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, त्यानंतर कीवमध्ये आलेले अमेरिकेचे राजदूत कीथ केलॉग यांनी झेलेन्स्की यांच्याशी चर्चा केली. युक्रेनचा सर्वात जवळचा देश असलेल्या पोलंडचे अध्यक्ष आंद्रेज दुडा यांनीही झेलेन्स्की यांना अमेरिकेसोबत करार करण्याचा सल्ला दिला. यानंतरच झेलेन्स्कींना अमेरिकेशी करार करण्याचा मार्ग समजला. त्यांनी युक्रेनसाठी नाटो सदस्यत्व किंवा सुरक्षा हमीची मागणी केली परंतु अमेरिकेने दोन्ही मागण्या नाकारल्या. आता युक्रेनला केवळ आर्थिक कराराद्वारेच अमेरिकेशी संबंध सुधारण्याची शक्यता दिसते.





