PMC Mayor: पुणे महानगरपालिकेच्या सत्ताकारणात हडपसर उपनगराला कायम दुय्यम वागणूक देण्याचे राजकारण पुन्हा एकदा ऐरणीवर आले आहे. आतापर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसने हडपसर उपनगरातून चार जणांना महापौर पदाची संधी दिली असताना, भाजपकडून मात्र नेहमीच पुणे शहर आणि पश्चिम भागालाच महत्त्वाची पदे दिली जात असल्याचा ठळक आरोप होत आहे. विशेष म्हणजे भाजपने पूर्व पुणे आणि उपनगर भागाला आजपर्यंत महापालिकेतील एकही मोठे पद दिलेले नाही. त्यामुळे उपनगर आणि पूर्व पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये तीव्र असंतोष खदखदत आहे. या पार्श्वभूमीवर हडपसर प्रभाग क्रमांक १६ मधून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेल्या भाजपच्या नगरसेविका उज्वला सुभाष जंगले यांच्या नावाची महापौर पदासाठी जोरदार चर्चा सुरू आहे. उपनगरातील तसेच मराठवाड्यातील लेकीला भाजपकडून संधी मिळणार का, की पुन्हा एकदा उपनगराची निराशा पदरी पडणार, असा सवाल आता उघडपणे विचारला जात आहे. Corporator Ujjwala Subhash Jungle, नुकत्याच झालेल्या महापालिका निवडणुकीत पालकमंत्र्यांनी स्वतः लक्ष घातले असतानाही उज्वला जंगले यांनी तब्बल ४६०७ मतांनी दणदणीत विजय मिळवला. हा विजय केवळ आकड्यांचा नसून, जनतेने भाजपवर आणि उज्वला जंगले यांच्यावर दाखवलेला ठाम विश्वास असल्याचे राजकीय विश्लेषक सांगत आहेत. उच्चशिक्षित, अभ्यासू आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क असलेल्या उज्वला जंगले यांनी आपल्या प्रभागात केलेल्या कामामुळेच हा विश्वास मिळाल्याची चर्चा आहे. नागरी प्रश्नांवर ठाम भूमिका, विकासकामांचा पाठपुरावा आणि नागरिकांशी थेट संवाद हे त्यांच्या कार्यशैलीचे वैशिष्ट्य मानले जाते. विशेष म्हणजे, १९९१ सालापासून भाजपशी एकनिष्ठ असलेले जंगले कुटुंबीय पक्षासाठी प्रतिकूल परिस्थितीतही कधीही डगमगले नाहीत. अशा निष्ठावंत कुटुंबाला आता पक्षाकडून न्याय मिळणार का, की निष्ठेलाही पुन्हा एकदा दुर्लक्ष सहन करावे लागणार, असा सवाल भाजपच्या अंतर्गत गोटातही उपस्थित होत आहे. हेही वाचा – Gold Silver Rates: चांदी एकाच दिवसात 1,28,000 रुपयांनी का घसरली? जाणून घ्या नेमकं कारण दरम्यान, हडपसर उपनगर आजही वाहतूक कोंडी, पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, अपुऱ्या आरोग्य सुविधा, बहुमजली रुग्णालयाचा अभाव अशा गंभीर समस्यांनी ग्रासलेले आहे. या प्रश्नांवर केवळ आश्वासनांपेक्षा सत्तास्थानी ठोस प्रतिनिधित्व आवश्यक असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. हडपसरला महापौर पदाची संधी मिळाल्याशिवाय उपनगराच्या प्रश्नांना न्याय मिळणार नाही, अशी ठाम भूमिका आता पुढे येत आहे. हडपसर विधानसभा मतदारसंघाने भाजपला दिलेले भरभरून मतदान पाहता, नेहमी पश्चिम पुण्याकडे झुकते माप देणारा भाजप यावेळी पूर्व पुणे व उपनगराला संधी देणार की नाही, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. हा निर्णय केवळ एका पदाचा नसून भाजपची उपनगराबाबतची भूमिका स्पष्ट करणारा ठरणार आहे. आता साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांच्या निर्णयाकडे. उज्वला सुभाष जंगले यांना महापौर पदाची संधी मिळणार का, की हडपसरला पुन्हा एकदा डावलले जाणार? हा निर्णय हडपसरच्या राजकारणाचीच नव्हे, तर भाजपच्या उपनगरातील विश्वासार्हतेचीही कसोटी ठरणार आहे.