Ujani Dam – पुणे, सोलापूर व अहिल्यानगर जिल्ह्यांचा महत्त्वाचा जलस्रोत असलेल्या उजनी धरणातील उपयुक्त पाणीसाठा झपाट्याने घटून उणे २२.८५ टक्क्यांवर पोहोचला आहे. धरणाच्या मृतसाठ्यातही २२ टक्क्यांनी घट झाली आहे. त्यामुळे पन्नास वर्षांपूर्वी धरण उभारणीवेळी जलमय झालेल्या गावांचे अवशेष आणि प्राचीन मंदिरांची शिखरे आता हळूहळू पाण्याबाहेर दिसू लागली आहेत. यामध्ये ऐतिहासिक पळसनाथ मंदिरही लवकरच पूर्णपणे उघडे होण्याची शक्यता आहे. सध्या धरणाची जलपातळी ४८९२४० मीटर इतकी नोंदविण्यात आली आहे. धरणातील एकूण पाणीसाठा ५१.४२ टीएमसी असला, तरी उपयुक्त साठा उणे ६.८४ टीएमसीपर्यंत खाली घसरला आहे. सध्या मुख्य कालव्यातून २, ३८० क्युसेक्सने, तर भीमा-सीना लिंक बोगद्यातून ४४० क्युसेक्सने विसर्ग सुरू आहे. सोलापूर शहराच्या पिण्याच्या पाण्यासाठी नदी पात्रासह सिना-माढा, दहिगाव उपसा सिंचन योजना आणि मुख्य कालव्यातून पाण्याचे आवर्तन सुरू आहे. दररोज सुमारे १० हजार क्युसेकपेक्षा अधिक वेगाने पाणी उपसा होत असल्याने धरणाची पातळी झपाट्याने खाली जात आहे. हीच स्थिती कायम राहिल्यास आणि पावसाने ओढ दिल्यास, पळसदेव येथील प्राचीन पळसनाथ मंदिर येत्या काही दिवसांत भाविकांना पूर्ण स्वरूपात पाहता येणार आहे. उजनीच्या विस्तीर्ण जलाशयातून डोके वर काढणारे मंदिराचे प्राचीन शिखर पाहण्यासाठी दरवर्षी राज्य तसेच परराज्यातून इतिहास अभ्यासक, पर्यटक आणि भाविकांची मोठी गर्दी होते. यंदाही पाणी पातळी अशीच घटत राहिल्यास पळसनाथ मंदिर पुन्हा एकदा पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरेल. मंदिराचा इतिहास आणि आकर्षण – उजनी धरणाच्या बांधणीनंतर १९७५ मध्ये जुन्या पळसदेव गावासह हे मंदिर जलमय झाले होते. त्यानंतर २४ वर्षांनी, म्हणजेच सन २००२ मध्ये हे मंदिर पहिल्यांदा पूर्णपणे उघडे पडले. यानंतर २०१३, २०१७, २०२३ आणि २०२४ अशा एकूण पाच वेळा मंदिर जलाशयाबाहेर आले आहे. ज्या वर्षी दुष्काळी परिस्थिती निर्माण होते, त्यावर्षी हे मंदिर भाविकांना पाहता येते.