प्रभात वृत्तसेवा पुणे – देशभरातील मान्यता नसलेल्या ‘बोगस’ विद्यापीठांमुळे दरवर्षी हजारो विद्यार्थ्यांचे शैक्षणिक आणि आर्थिक नुकसान होत आहे. विद्यार्थी आणि पालकांची होणारी ही फसवणूक रोखण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील २२ मान्यता नसलेल्या विद्यापीठांची नवी यादी जाहीर केली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या यादीत महाराष्ट्रातील नागपूर येथील ‘राजा अरेबिक युनिव्हर्सिटी’ चा समावेश आहे.यूजीसीने या बनावट संस्थांवर कारवाई करण्याचे स्पष्ट निर्देश संबंधित राज्य सरकार यांना दिलेले असतानाही त्याकडे सर्रास दुर्लक्ष होत असल्याचे चित्र आहे. सरकारच्या या उदासीनतेमुळे अशा संस्थांचे फावले असून, विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ सुरूच राहण्याची भीती व्यक्त होत आहे. यूजीसी कायदा १९५६ नुसार, विद्यापीठाचा दर्जा नसतानाही अनेक संस्थांकडून ‘विद्यापीठ’ या शब्दाचा वापर करून विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात येत आहेत. मान्यता नसल्यास कोणत्याही संस्थेने ‘विद्यापीठ’ या शब्दाचा वापर करणे हा कायदेशीर गुन्हा आहे. विद्यार्थी आणि पालकांची दिशाभूल होऊ नये, यासाठी यूजीसी दरवर्षी ऑक्टोबर महिन्यात अशा बोगस विद्यापीठांची यादी जाहीर करते. दिल्लीत सर्वाधिक बोगस विद्यापीठे यंदा यूजीसीने जाहीर केलेल्या २२ बोगस विद्यापीठांच्या यादीत सर्वाधिक १० विद्यापीठे एकट्या राजधानी दिल्लीत आहेत. त्याखालोखाल उत्तर प्रदेशमध्ये चार विद्यापीठांचा समावेश आहे. मागील पाच वर्षांमध्ये दिल्लीतील मान्यता नसलेल्या विद्यापीठांच्या संख्येत वाढ झाली आहे. यूजीसीने या यादीसोबतच संबंधित राज्य सरकारांना या बनावट संस्थांवर कठोर कारवाई करावी, असे सूचित केले आहे. मात्र, यातील अनेक विद्यापीठे मागील बऱ्याच वर्षांपासून खुलेआम सुरू असूनही, त्यांच्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. राज्य सरकारांच्या या दुर्लक्षामुळेच अशा संस्थांचे पेव फुटत असून, विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात ढकलले जात आहे. मान्यता नसलेल्या विद्यापीठांमध्ये प्रवेश घेण्यापूर्वी विद्यार्थी आणि पालकांनी अत्यंत सावधगिरी बाळगावी. कोणत्याही संस्थेत प्रवेश निश्चित करण्यापूर्वी यूजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावरून त्या संस्थेची मान्यता तपासून घ्यावी, असे आवाहन यूजीसीकडून करण्यात आले आहे.