UEFA Euro Cup 2024 : हंगेरीच्या आशा कायम तर पराभवासह स्कॉटलंडचे आव्हान संपुष्टात…

UEFA Euro Cup 2024 (Scotland vs Hungary) :- युरो अजिंक्यपद फुटबॉल स्पर्धेतील अ-गटात अखेरच्या साखळी सामन्यात अगदी शेवटच्या मिनिटापर्यंत चुरस पाहायला मिळाली. जर्मनी विरुद्ध स्वित्झर्लंड आणि हंगेरी विरुद्ध स्कॉटलंड या दोन्ही सामन्यांचे निकाल 90 मिनिटांनंतरच्या भरपाई वेळेतच लागले. राखीव खेळाडू निक्लस फुलक्रुगने 92 व्या मिनिटाला केलेल्या गोलमुळे जर्मनीने स्वित्झर्लंडला 1-1 असे बरोबरीत रोखले. याबरोबरीने जर्मनीने गटात अग्रस्थान मिळवले. दुसरीकडे केव्हिन सोबोथने सामन्याच्या अगदी अखेरच्या किकवर 100 व्या मिनिटाला गोल करून हंगेरीला स्कॉटलंडविरुद्ध 1-0 असा विजय मिळवून दिला.
हंगेरीविरूध्दच्या 1-0 पराभवामुळे स्कॉटलंडचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले, तर हंगेरीच्या सर्वोत्तम तिसरा संघ म्हणून बाद फेरी गाठण्याच्या आशा कायम आहेत. हंगेरी सध्या गटात तिसऱ्या स्थानावर आहे. सर्व गटातून तिसऱ्या स्थानावरील सर्वोत्तम चार संघ निवडण्यात येणार आहेत. पूर्वार्धात चेंडूवर 61 टक्के वेळ ताबा राखूनही स्कॉटलंडला गोलजाळीच्या दिशेने एकही किक मारता आली नाही.
UEFA Euro Cup 2024 : स्वित्झर्लंडविरूध्द गोल बरोबरीसह जर्मनी गटात अव्वलस्थानी….
पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळानंतर मात्र स्कॉटलंडचा खेळ खालावला. हंगेरीने आघाडीसाठी बरेच प्रयत्न केले. भरपाई वेळेच्या पहिल्याच मिनिटाला डॉमिनिक सोबोझ्लाईचा प्रयत्न स्कॉटलंडचा गोलरक्षक अन्गस गनने परतवून लावला. पुढच्याच मिनिटाला सोबोथची किक गोलपोस्टला धडकून बाहेर गेली. दोन्ही संघांकडून कमालीचा वेगवान खेळ झाला. स्कॉटलंडच्या मॅकटोमिनेने घसरत चेंडूला गोलजाळीची दिशा देण्याचा प्रयत्न केला, पण चेंडू बाहेर गेला. अखेर ही बरोबरीची कोंडी 100 व्या मिनिटाला फुटली.





